रत्नागिरी : शाळांमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून सूचना

रत्नागिरी : राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व शाळांमध्ये दररोज किमान ६ ते ७ तास विद्यार्थी उपस्थित असतात. या कालावधीत काही विद्यार्थ्यांना तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज भासू शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत शाळा प्रशासनाने समयसूचकता दाखवून तातडीने कार्यवाही केल्यास विद्यार्थ्याला वैद्यकीय मदत मिळून अप्रिय घटना टाळता येतील. त्यानुसार सर्व शाळांनी विद्यार्थ्यांना तातडीच्या याकामी काळात वैद्यकीय सुविधा देण्याच्या मार्गदर्शक सूचना राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत.

विद्यार्थ्यांना तत्काळ वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी सहकाऱ्यांनी त्याबाबतीत नेहमी सजग असणे आवश्यक आहे. यानुसार शाळेमध्ये प्रथमोपचाराकरता आजारी विद्याथ्यांना तातडीची वैद्यकीय व्यवस्था करण्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध कराव्या लागणार आहेत. संचालक, उपसंचालकांनी मासिक आढावा आवश्यकतेनुसार शिक्षणाधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करावे लागणार आहे.

प्राथमिक, माध्यमिक व उच्व माध्यमिक शिक्षण संचालकांनी आठ आठवडयाच्या आत शासनास कार्यपूर्तता अहवाल सादर करावा तसेच प्रतिवर्षी जानेवारी ते जुलै महिन्यात याबाबतच्या अंमलबजावणीचा आढावा घेवून शासनास एकत्रित अहवाल सादर करावा, अशा सूचना अन्वर सचिन प्रविण मुंडे यांनी दिल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक अशा जवळपास ३ हजार शाला आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या ही जिल्हा परिषदेच्या शाळांची आहे. जि.प. च्या एकूण २ हजार ४०० शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

उपाययोजनांबाबत सूचना….
शाळेत आवश्यकतेनुसार प्रथमोपचार पेट्या ठेवाव्यात, वर्षात एकदा वैद्यकीय तपासणी शिबिर घ्यावे. तातडीचे प्रथमोपचार देण्याबाबत प्रशिक्षण देण्यात यावे. रुग्णवाहिकांचे संपर्क क्रमांक दर्शनी भागात लावावेत. विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्याची गरज भासल्यास वाहन असावे, विद्यार्थ्यांकरता तणावमुक्तीसाठी कार्यशाळा घ्यावी विद्यार्थ्यांना समुपदेशकाची व्यवस्था करणे आवश्यक आहे. शाळेत आवश्यकतेनुसार समन्वयक नेमण्यात यावेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 PM 08/Nov/2024