Ratnagiri ZP Teacher Award: रत्नागिरी जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर! १० शिक्षकांची निवड

आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्यांच्या निवडीला विभागीय आयुक्तांची अंतिम मान्यता

रत्नागिरी:

जिल्हा परिषद रत्नागिरीच्या शिक्षण विभागामार्फत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी देण्यात येणाऱ्या जिल्हा परिषद ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील १० शिक्षकांची निवड झाली असून, विभागीय आयुक्त (कोकण विभाग, मुंबई) यांनी या निवडीला अंतिम मान्यता दिली असल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ. मनीषा जगदाळे यांनी दिली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. अस्मिता केंद्रे व मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वैदेही रानडे यांच्या वतीने शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

तालुकानिहाय पुरस्कार प्राप्त शिक्षकांची यादी

आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांची माहिती

शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात दिलेले उल्लेखनीय योगदान आणि त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे. तालुक्यातील पुरस्कार विजेत्या शिक्षकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:

  • मंडणगड: निलेश तुळशीराम लोखंडे (उपशिक्षक, जि. प. मराठी शाळा तिडे आदिवासीवाडी)
  • दापोली: दिनेश कानू चिपटे (उपशिक्षक, जि. प. आदर्श शाळा भरणे कोंडारण)
  • खेड: श्रीमती दिप्ती दिलीप यादव (पदवीधर विषय शिक्षिका, जि. प. शाळा माणी नंबर ०१)
  • चिपळूण: विनोद जानू हुंबरे (पदवीधर शिक्षक, जि. प. शाळा चिवेली वरची)
  • गुहागर: प्रभू रघुनाथ हबर्डे (उपशिक्षक, जि. प. आदर्श शाळा वेलदुर घरटवाडी)
  • संगमेश्वर: राजेश अर्जुन सावंत (पदवीधर शिक्षक, जि. प. आदर्श शाळा पूर)
  • रत्नागिरी: श्रीमती रश्मी राजन वाडेकर (उपशिक्षिका, जि. प. शाळा शिवार आबेरे नंबर ०२)
  • लांजा: दिलीप शंकर चव्हाण (पदवीधर शिक्षक, जि. प. आदर्श पन्हळे नंबर ०१)
  • राजापूर: श्रीमती स्नेहा सुहास काडगे (उपशिक्षिका, जि. प. आदर्श शाळा पाथर्डे)

विशेष कला पुरस्काराची घोषणा

नऊ तालुक्यांमधील शिक्षकांव्यतिरिक्त, संगमेश्वर तालुक्यातील जि. प. शाळा साडवली सह्याद्रीनगर येथील उपशिक्षक संदेश प्रकाश झेपले यांची ‘कला पुरस्कार’ (विशेष पुरस्कार) या बहुमानासाठी निवड करण्यात आली आहे. या गुणवंत शिक्षकांच्या निवडीबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजिक व प्रशासकीय वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 05-09-2026