१०० दिवसांच्या विशेष मोहिमेत ७ लाख ७४ हजार ३५० नागरिकांचे उद्दिष्ट; आशा स्वयंसेविका व आरोग्य सेवकांचे पथक जाणार घरोघरी
Non Communicable Diseases Health Drive Ratnagiri: महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यभर असंसर्गिक आजारांची (Non-Communicable Diseases) मोफत तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान १०० दिवसांची विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील ७ लाख ७४ हजार ३५० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
तपासणी मोहिमेसाठी जिल्ह्यात तीन विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून थेट घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली जात आहे. यापूर्वी जिल्ह्यात ३ लाख ७१ हजार ६९२ नागरिकांची तपासणी करण्यात आली होती. त्यामुळे ज्या नागरिकांची तपासणी आधी झालेली आहे, त्यांना वगळून उर्वरित नागरिकांची ही तपासणी केली जाणार आहे.
तपासणीदरम्यान एखाद्या नागरिकांमध्ये आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्यांना पुढील तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) पाठवण्यात येईल. तसेच आवश्यकतेनुसार तेथून जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी संदर्भित (Refer) केले जाईल. ३० वर्षांवरील सर्व नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे आणि लक्षणे आढळल्यास विलंब न करता तपासणी करून घ्यावी, असे आवाहन अतिरिक्त आरोग्य अधिकारी महेंद्र गावडे यांनी केले आहे. तर आरोग्य कर्मचाऱ्यांना पूर्ण सहकार्य करून ही तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:59 04-09-2026














