Ratnagiri Lok Adalat News: रत्नागिरी जिल्ह्यात १२ सप्टेंबर रोजी ‘राष्ट्रीय लोक न्यायालय’; तडजोडीसाठी प्रकरणांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन

जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयांमध्ये आयोजन; फौजदारी, दिवाणी, चेक बाउंस व थकबाकीच्या प्रकरणांवर होणार सामंजस्याने मार्ग

Ratnagiri Lok Adalat News: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे १२ सप्टेंबर रोजी रत्नागिरी येथील जिल्हा न्यायालय आणि जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये ‘राष्ट्रीय लोक न्यायालय’ आयोजित करण्यात आले आहे.

या लोक न्यायालयाचा पक्षकारांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी केले आहे.

आपली प्रलंबित किंवा दाखलपूर्व प्रकरणे या राष्ट्रीय लोक न्यायालयात तडजोडीसाठी ठेवण्याकरिता पक्षकारांनी आपले वकील, संबंधित न्यायालय किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील यांनी केले आहे.

या लोक न्यायालयात न्यायालयांमधील तडजोडयोग्य फौजदारी खटले, कौटुंबिक वाद, चेक बाउंस प्रकरणे, दिवाणी वाद, वीज कंपन्यांची थकबाकी, बँका व पतसंस्थांचे थकीत कर्ज, तसेच नगरपरिषद (न.प.) व ग्रामपंचायतींकडील थकीत घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची प्रकरणे आपापसातील सामंजस्याने आणि तडजोडीने मिटवण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. कोर्टाच्या फेऱ्या, वेळ आणि पैशांची बचत करण्यासाठी पक्षकारांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:57 04-09-2026