ग्रामीण ग्राहकांना मोठा दिलासा; शहरी आणि ग्रामीण भागासाठी एकसमान बुकिंग नियम; ४५ दिवसांच्या प्रतीक्षेतून सुटका
नवी दिल्ली : पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती एलपीजी (LPG) सिलिंडर रीफिल बुकिंगच्या नियमांमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे. दोन सिलिंडर बुकिंगमधील अनिवार्य कालावधीचे अंतर आता ४५ दिवसांवरून घटवून थेट २५ दिवस करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे विशेषतः ग्रामीण भागातील एलपीजी ग्राहकांना ४५ दिवसांच्या प्रदीर्घ आणि त्रासदायक प्रतीक्षेतून मुक्ती मिळाली असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
LPG Cylinder Refill Rules: सर्व ग्राहकांसाठी एकसमान नियम लागू
नवीन निर्णयानुसार, आता ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही क्षेत्रांतील सर्व प्रकारच्या घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी २५ दिवसांचा एकसमान बुकिंग नियम लागू करण्यात आला आहे. यापूर्वी ग्रामीण भागात दोन रीफिल बुकिंगमध्ये ४५ दिवसांचे बंधन असल्याने अनेक कुटुंबांना सिलिंडर संपल्यानंतर अडचणींचा सामना करावा लागत होता.
कसा असेल नवीन नियम?
सुधारित नियमानुसार, आता कोणत्याही घरगुती ग्राहकाला आदला एलपीजी सिलिंडर बुक केल्यानंतर किमान २५ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यावरच पुढील सिलिंडरसाठी बुकिंग करता येणार आहे. या निर्णयामुळे काळ्या बाजाराला आळा बसण्यास मदत होईल, तसेच गरजू कुटुंबांना वेळेवर सिलिंडर उपलब्ध होण्यास सुलभता येईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:23 07-09-2026














