दक्षिण व उत्तर रत्नागिरी भाजप कार्यकारिणीची घेणार बैठक; स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
रत्नागिरी: रवींद्र चव्हाण रत्नागिरी दौरा अंतर्गत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण हे आज, ९ सप्टेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत दक्षिण व उत्तर रत्नागिरी भाजप जिल्हा कार्यकारिणीची बैठक होणार आहे. प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर चव्हाण यांचा रत्नागिरीतील हा तिसरा दौरा असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
दक्षिण रत्नागिरी भाजप कार्यकारिणीची बैठक
नियोजित वेळापत्रकानुसार, बुधवारी दुपारी ३ वाजता स्वयंवर मंगल कार्यालयात दक्षिण रत्नागिरी भाजप कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. पक्षाच्या घटनेनुसार प्रदेश कार्यकारिणी झाल्यानंतर सात दिवसांच्या आत जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेण्याची प्रक्रिया अनिवार्य असते. त्यामुळे संघटनात्मकदृष्ट्या या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी तयारीला वेग दिला आहे.
प्रमुख नेत्यांची उपस्थिती आणि मार्गदर्शन
या बैठकीत चव्हाण यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी, आगामी राजकीय आव्हाने आणि पक्षविस्ताराबाबत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात आमदार रवींद्र चव्हाण यांच्या समवेत आमदार योगेश सागर, आमदार निरंजन डावखरे आणि माजी आमदार प्रमोद जठार उपस्थित राहणार आहेत.
उत्तर रत्नागिरी कार्यकारिणी बैठक चिपळूण येथे होणार
दक्षिण रत्नागिरीची बैठक आटोपल्यानंतर रवींद्र चव्हाण हे उत्तर रत्नागिरीची बैठक घेण्यासाठी चिपळूणकडे रवाना होतील. चिपळूण येथे होणाऱ्या बैठकीसाठी उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी जोरदार तयारी केली आहे. प्रदेशाध्यक्षांच्या या कोकण दौऱ्यामुळे भाजपच्या स्थानिक संघटनेत नवचैतन्य निर्माण झाले असून, या बैठकीत पक्षाच्या आगामी वाटचालीबाबत कोणते निर्णय घेतले जातात आणि कोणता संदेश दिला जातो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 09-09-2026














