पोलीस, आरोग्य आणि पाटबंधारे विभागालाही दणका; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक मोहीम
रत्नागिरी एसीबी कारवाई अंतर्गत शासकीय कामासाठी नागरिकांची अडवणूक करून लाचेची मागणी करणाऱ्या लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडक मोहीम सुरू ठेवली आहे. चालू वर्षातील जानेवारी ते ऑगस्ट या अवघ्या आठ महिन्यांत ८ सापळ्यांमध्ये ११ जण एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. यामध्ये एका खासगी मध्यस्थाचाही समावेश आहे. या कारवायांमध्ये महसूल विभागातील सर्वाधिक ६ जणांवर कारवाई झाली असून त्यापाठोपाठ पोलीस, पाटबंधारे आणि आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर एसीबीने कारवाईचा बडगा उगारला आहे.
कुठल्या विभागात किती कारवाई?
रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार विविध विभागांतील कारवायांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
- महसूल विभाग: ५ प्रकरणांत ६ जणांवर कारवाई झाली. यात ३ मंडळ अधिकारी, २ तलाठी आणि १ कोतवाल यांचा समावेश आहे.
- पोलीस प्रशासन: एका प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकासह एका खासगी व्यक्तीवर कारवाई करण्यात आली.
- पाटबंधारे विभाग: एका प्रकरणात कार्यकारी अभियंता आणि लिपिक एसीबीच्या कारवाईत सापडले.
- आरोग्य विभाग: एका प्रकरणात वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली.
‘लाच’ला नाही म्हणा; एसीबीला कळवा!
शासकीय काम करून देण्यासाठी अधिकारी किंवा कर्मचारी विनाकारण अडवणूक करून लाचेची मागणी करत असेल, तर नागरिकांनी दबावाला बळी न पडता थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे. लाच मागणे आणि लाच घेणे हा गुन्हा आहे; मात्र लाच देणेही कायद्याने गुन्हाच आहे. त्यामुळे नागरिकांनी भ्रष्टाचाराला खतपाणी न घालता त्याविरोधात आवाज उठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
“शासकीय कामासाठी कोणी लाचेची मागणी करत असेल तर नागरिकांनी घाबरू नये. लाच देण्यास स्पष्ट नकार देऊन तात्काळ एसीबीशी संपर्क साधावा. भ्रष्टाचाराविरोणातील कारवाई प्रभावी करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे,” असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी केले आहे.
मोबाईल ठरू शकतो महत्त्वाचा पुरावा आणि तक्रारीसाठी संपर्क
लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी प्रसंगावधान राखून शक्य असल्यास ऑडिओ किंवा व्हिडिओच्या माध्यमातून पुरावा नोंदवावा आणि एसीबीच्या अधिकृत पोर्टल अथवा मोबाईल ॲपवरील तक्रार सुविधेद्वारे माहिती द्यावी, असे विभागाने स्पष्ट केले आहे.
तक्रारीसाठी नागरिकांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:
- टोल फ्री क्रमांक: १०६४
- व्हॉट्सॲप: ७०३८३९१०६४
- दूरध्वनी: ०२३५२-२२२८९३
८ महिन्यांत ११ जणांवर कारवाई झाली असली तरी ही संख्या भ्रष्टाचाराचे संपूर्ण चित्र दाखवत नाही. सरकारी कार्यालयात लाच मागितली जाते तेव्हा ‘आपले काम आहे, पैसे द्यावेच लागतील’ असा समज बाजूला सारून नागरिकांनी तक्रार करण्याचे धाडस दाखवले, तरच भ्रष्टाचाराची साखळी खऱ्या अर्थाने तुटू शकते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 09-09-2026














