Chiplun Bus Stand: चिपळूण बस स्थानकातील फलाटांवर फलक नसल्याने प्रवाशांचा गोंधळ; एसटी प्रशासनाला लेखी निवेदन

बस चुकण्याच्या भीतीने प्रवाशांची धावपळ; फलक लावण्याची मागणी

चिपळूण बस स्थानक प्रवासी गोंधळ प्रकरणी बस स्थानकावरील फलाटांचे (प्लॅटफॉर्म) फलक नसल्यामुळे प्रवासी वर्गाची मोठी अडचण होत आहे. या गोंधळाबाबत सामाजिक कार्यकर्ते नित्यानंद भागवत यांनी एसटी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

फलाटांचे फलक नसल्याने प्रवाशांची धावपळ

चिपळूण बस स्थानकातील जुनी इमारत पाडल्यानंतर सध्या पूर्वीचे अवघे तीन फलाट सुरू आहेत. या तीन फलाटांवरूनच सर्व बसेस सुटत आहेत. वाहतूक नियंत्रक बसेसची उद्घोषणा करताना पूर्वीप्रमाणे फलाटांचा उल्लेख करतात; मात्र सदर तिन्ही फलाटांवर दिशादर्शक किंवा क्रमांकांचे फलक लावलेले नाहीत. यामुळे नवीन प्रवासी वर्गाची फलाट शोधण्यासाठी मोठी धावपळ उडते.

गाड्या चुकण्याची भीती आणि एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष

वाहतूक नियंत्रण कक्षात प्रवासी फलाटांची विचारणा करेपर्यंत अनेकदा बसेस सुटून जातात आणि प्रवाशांच्या गाड्या चुकतात. आठ दिवसांपूर्वी ही गोष्ट लक्षात आल्यानंतर नित्यानंद भागवत यांनी स्थानिक आगार प्रमुखांकडे प्रवाशांची ही अडचण लक्षात आणून दिली होती. परंतु आजपर्यंत त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

त्यामुळे आज नाईलाजाने भागवत यांनी एसटी प्रशासनाला लेखी तक्रार देऊन या समस्येकडे गांभीर्याने लक्ष वेधले असून तातडीने फलाटांचे फलक लावण्याची मागणी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:00 09-09-2026