पर्यावरण तज्ज्ञ मंदार प्रभुदेसाई यांचे मार्गदर्शन; ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी घेतले प्रत्यक्ष प्रात्यक्षिक
सर्वंकष विद्या मंदिर कंपोस्ट कार्यशाळा उपक्रमांतर्गत रत्नागिरी शहरालगतच्या कुर्ली येथील सर्वंकष विद्या मंदिरमध्ये स्वयंपाकघरातील सेंद्रिय कचऱ्यापासून कंपोस्ट निर्मिती कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या सक्रिय व उत्स्फूर्त सहभागात पार पडली. या कार्यशाळेसाठी पर्यावरण विषयाचे तज्ज्ञ अभ्यासक मंदार प्रभुदेसाई यांचे मार्गदर्शन लाभले.
पर्यावरण जागृती आणि ‘ग्रीन स्कूल’ संकल्पना
बदलते हवामान, जमिनीचा कमी होत चाललेला कस आणि त्याचा पिकांवर होणारा परिणाम, तसेच स्वयंपाकघरातील सेंद्रिय कचऱ्याचा योग्य वापर याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने बुधवार, ९ सप्टेंबर रोजी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेच्या ‘इको क्लब’ आणि कौशल्य शिक्षणातील ‘कॉम्पोझिट स्किल लॅब’च्या माध्यमातून ही कार्यशाळा घेण्यात आली. पर्यावरण संवर्धन, कचऱ्याचे शास्त्रीय व्यवस्थापन, कंपोस्ट निर्मिती आणि शाश्वत जीवनशैलीचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा, हा यामागील मुख्य उद्देश होता. ‘ग्रीन स्कूल’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने शाळेने उचललेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. हा उपक्रम सीबीएसईच्या अनुभवाधारित व कौशल्याधारित शिक्षणाला प्रोत्साहन देणारा ठरणार आहे.
प्रात्यक्षिक आणि शंका निरसन
मार्गदर्शक मंदार प्रभुदेसाई यांनी कंपोस्ट निर्मितीबाबत सविस्तर माहिती देत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी यात सक्रिय सहभाग नोंदवत स्वतः कंपोस्ट तयार केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना प्रभुदेसाई यांनी समर्पक उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. मोनिका जायस्वाल यांनी सेंद्रिय शेती, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत जीवनशैली ही काळाची गरज असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना कंपोस्ट निर्मितीसाठी प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन शिक्षक श्री. जॅरेड डायस यांनी केले असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:38 09-09-2026














