Maratha Reservation Protest Antarwali Sarati: ‘मराठा आंदोलन मोडीत काढण्याचे षडयंत्र’; मनोज जरांगेंचा राज्य सरकारवर घणाघाती आरोप

उपोषणाचा १२ वा दिवस: १२ तारखेच्या आत आरक्षण द्या, अन्यथा मुंबईला धडकणार; जरांगे पाटलांचा अंतिम इशारा

मनोज जरांगे उपोषण प्रकरणी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू असून आज उपोषणाचा १२ वा दिवस आहे. उपोषण तीव्र होत असतानाच मनोज जरांगे यांनी राज्य सरकार, मंत्री आणि सत्ताधारी आमदारांवर अत्यंत कडक शब्दांत तोफ डागली आहे. शासकीय बैठकीचा आणि सरकारमधील काही मंत्र्यांच्या भूमिकेचा समाचार घेताना, “मराठा आंदोलन मोडीत काढण्याचे षडयंत्र रचले जात आहे,” असा थेट आरोप जरांगे यांनी केला आहे. “तुम्ही सपशेल हरले आहात, तुम्ही आता हार मानायला हवी,” अशा शब्दांत त्यांनी सरकारला सुनावले आहे.

‘आंदोलन मोडीत काढण्यासाठी कट कारस्थानं’

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, “मी कोणाचेही ऐकत नाही, पण केवळ लाड आणि सामंत यांच्या शब्दावर विश्वास ठेवून मी सलाईन घेतली होती आणि त्यांचा शब्द न् शब्द ऐकला होता. परंतु आता मराठा आंदोलन मोडीत काढण्यासाठी अंतर्गत कट कारस्थानं सुरू आहेत.” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट हल्ला चढवत जरांगे म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्यात दंगल घडवायची आहे आणि जर तसे झाले, तर त्याला सर्वस्वी तेच जबाबदार राहतील. तुम्ही सर्व आमदार आणि मंत्री एका बाजूला झालात, तरी आमचे काहीही वाकडं करू शकत नाही.”

आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर सडकून टीका

आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर टीका करताना जरांगे पाटील म्हणाले की, “प्रताप सरनाईक मधेच आले आहेत. ते म्हणे एसटी भरून लोक आणणार आहेत? ते येणार पण नाहीत आणि आले तर मराठे असे गोटे मारतील की पळता भुई थोडी होईल. आम्ही आता तुमचे वस्ताद होणार आहोत. तुमच्या नेत्याला आम्ही आधी ३ वर्षे गोड बोलत होतो, ते का सांगत नाही?” असा सवाल करत आरक्षण संपवायला निघालात पण ते कधीच संपणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सरकारला १२ तारखेचा अंतिम इशारा

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला थेट इशारा देत जरांगे पाटील म्हणाले की, “१२ तारखेच्या आत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा, नाहीतर आम्ही मुंबईला जाणार म्हणजे जाणार! आमचा संयम सुटला की तुम्हाला आमची ताकद कळेल.”

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:04 09-09-2026