हवामान विभागाचा पुढील ५ दिवसांचा अंदाज; १० व ११ सप्टेंबर शांततेचे, तर वीकेंडला मुसळधार पावसाची शक्यता
रत्नागिरी : भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) कोकण विभागासाठी पुढील पाच दिवसांचा अधिकृत हवामान अंदाज जाहीर केला असून, १२ सप्टेंबरपासून रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १० आणि ११ सप्टेंबर रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघर या सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता असल्याने कोणताही मोठा इशारा दिलेला नाही. मात्र, १२ सप्टेंबरपासून कोकणात विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
१२ ते १४ सप्टेंबर दरम्यान हवामानाची स्थिती
शनिवार, १२ सप्टेंबरपासून रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह पाऊस हजेरी लावेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही या काळात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
रविवार, १३ सप्टेंबर आणि सोमवार, १४ सप्टेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा (३०-४० किमी/तास) यांसह हलका ते मध्यम पाऊस सुरूच राहील. दुसरीकडे, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत १३ सप्टेंबर रोजी पावसाचा जोर अधिक वाढून काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नागरिकांसाठी आणि मच्छीमारांसाठी सुरक्षेच्या सूचना
वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. वादळाच्या वेळी उघड्यावर काम करणे, उंच झाडांखाली किंवा धातूच्या वस्तूंच्या जवळ आश्रय घेणे टाळावे, तसेच घरातील विजेची उपकरणे प्लगवरून काढून ठेवावीत. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी व किनारपट्टीवरील नागरिकांनी विशेष दक्षता बाळगावी.
शेतकऱ्यांनी घ्यावयाची खबरदारी
पावसामुळे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी हवामान विभागाने कृषी सल्ला जारी केला आहे. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी तयार झालेल्या शेतमालाची लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी काढणी करावी. वादळ आणि पावसामुळे साठवलेला माल खराब होऊ नये म्हणून तो सुरक्षित स्थळी हलवावा, तसेच शेतात साचणाऱ्या पाण्याचा योग्य रीतीने निचरा होईल याची खबरदारी घ्यावी.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 11-09-2026














