रत्नागिरी स्वच्छ ठेवणाऱ्या कष्टकरी हातांना गणेशोत्सवाची भेट; नगरपरिषदेच्या सर्व कामगारांना ‘गणेशोत्सव किट’चे वाटप

रत्नागिरी स्वच्छ ठेवणाऱ्या कष्टकरी हातांना गणेशोत्सवाची भेट; नगरपरिषदेच्या सर्व कामगारांना 'गणेशोत्सव किट'चे वाटप

वर्षाताई ढेकणे व दादा ढेकणे यांचा पुढाकार; कंत्राटी व कायमस्वरूपी कामगारांप्रती कृतज्ञता व्यक्त

रत्नागिरी : रत्नागिरी शहर स्वच्छ, सुंदर आणि नागरिकांसाठी सुविधायुक्त ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या रत्नागिरी नगरपरिषदेतील कंत्राटी तसेच कायमस्वरूपी कामगारांचा गणेशोत्सवानिमित्त आपुलकीने सन्मान करण्यात आला. नगरपरिषदेच्या नगरसेविका तथा भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे आणि भाजप शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या वतीने नगरपरिषदेच्या विविध विभागांतील सर्व महिला व पुरुष कामगारांना ‘गणेशोत्सव किट’ भेट म्हणून वितरित करण्यात आले.

कष्टकरी हातांप्रती कृतज्ञतेची भावना

शहरातील स्वच्छता, सुरळीत पाणीपुरवठा, सार्वजनिक ठिकाणांची देखभाल, बांधकाम तसेच नागरिकांच्या दैनंदिन नागरी सुविधांशी संबंधित विविध कामे नगरपरिषदेचे कर्मचारी सातत्याने व प्रामाणिकपणे पार पाडत असतात. त्यांच्या अविरत मेहनतीमुळेच शहर स्वच्छ आणि सुंदर राहण्यास मोठी मदत होते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या आनंदात या कष्टकऱ्यांचाही सहभाग असावा आणि त्यांच्या सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी, या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला.

मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, गटनेते राजू तोडणकर, नगरसेविका सुप्रिया रसाळ, नगरसेविका मानसी करमरकर, नगरसेवक संदीप सुर्वे आणि नगरसेवक नितीन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. शहराच्या विकासात आणि स्वच्छतेत प्रत्यक्ष योगदान देणाऱ्या या घटकाचा सन्मान करणे ही सर्वांची सामाजिक जबाबदारी असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. बाप्पाच्या आगमनापूर्वी मिळालेल्या या आपुलकीच्या भेटीबद्दल कामगारांनी समाधान व्यक्त करत ढेकणे कुटुंबीयांचे आभार मानले.