Ratnagiri Mirkarwada: मिरकरवाडा परिसरात कुत्र्यांना दुचाकीला बांधून फरफटत नेले; एकावर गुन्हा दाखल

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; घटनास्थळी महिलेची जाब विचारताना तरुणांशी बाचाबाची

रत्नागिरी :

रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा परिसरात बुधवारी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास दोन तरुणांनी कुत्र्यांना दुचाकीला बांधून फरफटत नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसृत झाल्यानंतर शहर पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे. याप्रकरणी कामरान मजगावकर (रा. मिरकरवाडा) या तरुणावर अमानुष वर्तनाबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दोन तरुण कुत्र्यांना दुचाकीला बांधून रस्त्यावरून ओढत नेताना दिसत आहेत. या प्रकाराची गंभीर दखल घेत एका स्थानिक महिलेने घटनास्थळी संबंधित तरुणांना थांबवून जाब विचारला. “कुत्र्यांना अशाप्रकारे फरफटत नेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे,” असे विचारले असता, तरुणांनी उत्तर देण्याऐवजी महिलेशी हुज्जत घालत आरडाओरड आणि शिवीगाळ केली.

या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई करत संबंधित तरुणांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. घटनेची माहिती पसरताच स्थानिक प्राणीप्रेमींनीही पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, मुक्या प्राण्यांवर अत्याचार करणाऱ्या दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 11-09-2026