पोलीस भरती प्रक्रियेत सुधारणा करा आणि पोलिसांना सणांसाठी हक्काची सुट्टी द्या; रत्नागिरीतील नागरिकाचे गृहमंत्र्यांना पत्र

पोलीस भरती प्रक्रियेत सुधारणा करा आणि पोलिसांना सणांसाठी हक्काची सुट्टी द्या; रत्नागिरीतील नागरिकाचे गृहमंत्र्यांना पत्र

अमेय परुळेकर यांचे केंद्र व राज्य शासनाकडे निवेदन; ५ वर्षांतून एकदा सणासाठी अधिकृत सुट्टी देण्याची केली मागणी

रत्नागिरी : कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्या पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी भरती प्रक्रियेत आमूलाग्र बदल करण्यात यावेत, तसेच सणासुदीच्या काळात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना आपल्या कुटुंबासोबत सण साजरा करण्यासाठी अधिकृत सुट्टी मंजूर करावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी रत्नागिरीतील जागरूक नागरिक अमेय प्रदीप परुळेकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्राचे गृहमंत्री, पोलीस महासंचालक (DGP) आणि रत्नागिरी पोलीस अधीक्षकांना लेखी निवेदन सादर केले आहे.

सेवांच्या स्वरूपानुसार स्वतंत्र परीक्षा पद्धतीची मागणी

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) आणि राज्य लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये सर्व सेवांसाठी एकाच पद्धतीची परीक्षा न घेता, पदाच्या कार्यस्वरूपानुसार स्वतंत्र परीक्षा घेण्यात याव्यात, असा मुद्दा निवेदनात मांडण्यात आला आहे. पोलीस दलाचे मुख्य काम गुन्हे नियंत्रण व कायदा-सुव्यवस्था राखणे हे असल्याने, लेखी परीक्षेपूर्वी उमेदवारांची शारीरिक (Physical) आणि मानसिक (Mental) चाचणी घेण्यात यावी. तसेच, लेखी परीक्षेतही वास्तविक घडलेल्या गुन्हेविषयक घटनांवर आधारित प्रश्न विचारून उमेदवाराच्या निर्णयक्षमतेची चाचणी घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली आहे. याशिवाय, एकाच संवर्गासाठी उमेदवारांना प्रयत्न (Attempts) मर्यादित ठेवण्याचा नियम असावा, असेही त्यांनी नमूद केले आहे.

५ वर्षांतून एकदा आवडीच्या सणासाठी २ दिवसांची अधिकृत सुट्टी द्या

पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी २४ तास जनतेच्या सेवेत तत्पर असतात. सण-उत्सव असोत वा आंदोलने, त्यांचा सर्वाधिक वेळ बंदोबस्तात जातो. त्यामुळे या जवानांनाही आपल्या कुटुंबीयांसोबत सण साजरे करता यावेत यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा. प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याकडून प्रतिज्ञापत्र (Affidavit) घेऊन, त्यांच्या पसंतीच्या एका सणासाठी दर ५ वर्षांतून एकदा किमान २ दिवसांची अधिकृत (Official) सुट्टी मंजूर करण्यात यावी, अशी आग्रही मागणी परुळेकर यांनी केली आहे. तसेच पुढील ५ वर्षांत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीपूर्वी अशी सुट्टी देण्यात यावी.

रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी

पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी रिक्त असलेली पदे कालबद्ध पद्धतीने तातडीने भरण्यात यावीत आणि राज्यभरात एकाच दिवशी पोलीस भरती परीक्षा घेऊन वेळेत निकाल जाहीर करण्यात यावेत, अशी मागणीही या निवेदनातून शासनाकडे करण्यात आली आहे.