गणपतीपुळे मंदिरात भाविकांसाठी ‘ड्रेस कोड’ लागू; १ जानेवारी २०२७ पासून शॉर्ट्स, बर्मुड्यावर बंदी

गणपतीपुळे मंदिरात भाविकांसाठी 'ड्रेस कोड' लागू; १ जानेवारी २०२७ पासून शॉर्ट्स, बर्मुड्यावर बंदी

मंदिराचे पावित्र्य व संस्कृती जपण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय; १० वर्षांखालील मुलांना नियमातून सूट

रत्नागिरी : कोकणातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे देवस्थान प्रशासनाने मंदिराच्या शिस्त व पावित्र्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि सभ्यता राखण्याच्या उद्देशाने मंदिरात ‘ड्रेस कोड’ (वस्त्रसंहिता) लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. हा नियम १ जानेवारी २०२७ पासून अत्यंत काटेकोरपणे लागू करण्यात येणार असून, मुख्य प्रवेशद्वारावर यासंदर्भातील माहिती व सूचना फलक लावण्यात आले आहेत अशी माहिती मंदिराचे मुख्य पुजारी अमित घनवटकर यांनी दिली आहे.

समुद्रकिनाऱ्यावरून थेट मंदिरात येण्यावर निर्बंध

गणपतीपुळे हे धार्मिक स्थळासोबतच प्रसिद्ध पर्यटनस्थळ असल्याने अनेक पर्यटक समुद्रकिनाऱ्यावरील मौजमजेनंतर थेट हाफ पँट, शॉर्ट्स, बर्मुडा, मिनी स्कर्ट किंवा बीचवेअर परिधान करून मंदिरात दर्शनासाठी येत असल्याचे चित्र दिसत होते. मात्र, नव्या नियमांनुसार अशा कपड्यांना मंदिरात पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. याशिवाय अंगप्रदर्शन करणारे, तोकडे किंवा आक्षेपार्ह मजकूर आणि चित्रे असलेले कपडे घातलेल्या व्यक्तींना मंदिरात प्रवेश नाकारला जाईल.

सात्विक व पारंपरिक वेशभूषा बंधनकारक; लहान मुलांना सूट

नवीन वस्त्रसंहितेनुसार महिला व पुरुष या दोघांनाही अंगभर, सात्विक आणि भारतीय संस्कृतीला शोभेल अशा सभ्य व पारंपरिक वेशभूषेतच मंदिरात प्रवेश दिला जाईल. दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाने या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. तथापि, १० वर्षांखालील लहान मुला-मुलींना या ड्रेस कोडमधून विशेष सूट देण्यात आली आहे.

प्रशासनाकडून व्यापक जनजागृती मोहीम

नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून हा नियम सुरू होत असल्याने भाविकांची ऐनवेळी गैरसोय किंवा तारांबळ होऊ नये, यासाठी मंदिर प्रशासनाने जनजागृती मोहीम सुरू केली आहे. मंदिराच्या विविध भागांत मार्गदर्शक फलक, माहितीपत्रके आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून भाविकांना या नियमांची माहिती दिली जात आहे. मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.