Breaking : रत्नागिरीत पहाटेच्या सुमारास थरार; आठवडा बाजारात अज्ञात इसमाने काचा फोडून चारचाकी पेटवली

Breaking : रत्नागिरीत पहाटेच्या सुमारास थरार; आठवडा बाजारात अज्ञात इसमाने काचा फोडून चारचाकी पेटवली

आगीत गाडी जळून खाक, मोठे नुकसान; अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली, शहर पोलीस तपास करत आहेत

रत्नागिरी : रत्नागिरी शहराच्या गजबजलेल्या आठवडा बाजार परिसरात आज पहाटेच्या सुमारास एका उभ्या चारचाकी वाहनाला अज्ञात इसमाने जाळून खाक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संशयित इसमाने आधी गाडीच्या काचा फोडल्या आणि त्यानंतर गाडीला थेट आग लावून घटनास्थळावरून पळ काढला. या आगीत चारचाकीचे प्रचंड नुकसान झाले असून संपूर्ण गाडी जळून खाक झाली आहे.

काचा फोडून लावली आग; आरोपी फरार

मिळालेल्या माहितीनुसार, आठवडा बाजार परिसरात उभ्या असलेल्या चारचाकीजवळ आज पहाटे एक संशयित इसम आला. त्याने प्रथम गाडीच्या काचा फोडल्या आणि त्यानंतर गाडी पेटवून दिली. गाडीने पेट घेताच आरोपीने अंधाराचा फायदा घेत तिथून पळ काढला. पहाटेच्या शांततेत गाडीतून आगीच्या ज्वाला आणि धूर निघत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले.

अग्निशमन दलाने विझवली आग; पोलिसांकडून तपास सुरू

गाडी जळत असल्याचे दिसताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ रत्नागिरी शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच रत्नागिरी नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत गाडीचा मोठा भाग जळून खाक झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून अज्ञात इसमाचा शोध घेतला जात आहे.