Rajapur Bus Accident: राजापूरजवळ टेम्पो ट्रॅव्हलर मोरीवर आदळून भीषण अपघात; एकाच कुटुंबातील १६ जण जखमी

Rajapur Bus Accident: राजापूरजवळ टेम्पो ट्रॅव्हलर मोरीवर आदळून भीषण अपघात; एकाच कुटुंबातील १६ जण जखमी

गणेशोत्सवासाठी गावी जाताना दुर्घटना; १० गंभीर जखमींवर रत्नागिरीत उपचार सुरू

Rajapur Bus Accident मध्ये गणेशोत्सवासाठी मुंबईवरून मालवणच्या दिशेने जाणाऱ्या एकाच कुटुंबातील तब्बल १६ प्रवासी जखमी झाले आहेत. मुंबई-कुर्ला येथून मालवण-कुणकवळे येथे जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर्स चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. रविवारी सकाळी ९.२० च्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील हातिवलेनजीक असलेल्या हॉटेल शिवानंदसमोर भरधाव ट्रॅव्हलर रस्त्याच्या कडेला असलेल्या मोरीवर जाऊन आदळली. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात चालक अक्षय यादव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rajapur Bus Accident मधील जखमी आणि उपचारांची माहिती

मुंबई-कुर्ला येथील देसाई कुटुंबीय टेम्पो ट्रॅव्हलर्सने (क्र. डीडी ०१ एजी ९५७३) गणेशोत्सवासाठी मालवण कुणकवळे येथे जात होते. हातिवलेत गाडी आल्यावर चालक अक्षय सुनील यादव (३०, रा. रहिमतपूर) याचा ताबा सुटल्याने गाडी मोरीवर आदळली. या अपघातात दोन लहान मुलांसह ट्रॅव्हलरमधील चालकासह सर्व १६ प्रवासी जखमी झाले.

गंभीर जखमी (१० जण): चालक अक्षय यादव, सखाराम महादेव देसाई (६८), शशिकांत नारायण देसाई (४७), सुषमा सखाराम देसाई (६५), राकेश सखाराम देसाई (३८), रुचा राजेश देसाई (३५), आयाध्य राजेश देसाई (४), संतोष महादेव देसाई (५३), स्नेहल संतोष देसाई (४५) आणि विनिती राकेश देसाई (३५, सर्व रा. कुर्ला, मुंबई). यातील सहा जणांना फ्रॅक्चर झाले असून चार जणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

किरकोळ जखमी (६ जण): चिन्मय संतोष देसाई (१८), जान्हवी संतोष देसाई (२०), तिर्था राकेश देसाई (२), ऊर्मिला उल्हास देसाई (५२) आणि भक्ती उल्हास देसाई (२६).

स्थानिकांची मदत अन् पोलिसांची धाव

अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव, सहायक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील आणि सागर खंडागळे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक रिक्षाचालक संतोष सातोसे, नाना कुवळेकर, पोलीस पाटील धालवलकर आणि ग्रामस्थांनी जखमींना तातडीने राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉ. राम मेस्त्री यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर गंभीर जखमी १० जणांना आणि त्यांच्यासोबत उर्वरित जखमींना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलवले आहे.