Sewa Sankalp Abhiyan: रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून ‘सेवा संकल्प अभियान’; प्रत्येक ग्रामपंचायतीत २०० वृक्षलागवड व आरोग्य शिबिरे

Sewa Sankalp Abhiyan: रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून 'सेवा संकल्प अभियान'; प्रत्येक ग्रामपंचायतीत २०० वृक्षलागवड व आरोग्य शिबिरे

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे आवाहन; शासकीय यंत्रणांनी जबाबदारी चोख पाडण्याचे निर्देश

Sewa Sankalp Abhiyan चा शुभारंभ रत्नागिरी जिल्ह्यात आज, गुरुवारी (१७ सप्टेंबर) भव्य प्रमाणावर होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घटनात्मक पदावरील सेवेची २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणि ‘सेवा परमो धर्म:’ हा विचार तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राज्यभरात हे अभियान राबवले जात आहे. या लोककल्याणकारी अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये २०० वृक्षांची लागवड करून आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन करून अभियानाचा प्रारंभ केला जाणार आहे. सर्व शासकीय यंत्रणांनी सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडत हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विशेष आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील आणि प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रविंद बिरादार यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. जिंदल म्हणाले की, "सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुकर करणे आणि त्यांना शासकीय सेवांचा थेट लाभ मिळवून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून योजनांची व्यापक जनजागृती करावी. ‘सेवा सेतू’ उपक्रमांतर्गत सर्व तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर विशेष शिबिरे भरवून प्रलंबित दाखले व सेवा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात."

Sewa Sankalp Abhiyan अंतर्गत विविध विभागांवर सोपवलेली जबाबदारी

अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी विविध शासकीय विभागांवर महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत:

स्वच्छता मोहीम: ‘सेवा माझे योगदान’ अंतर्गत नगरपरिषदा व पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध समुद्रकिनारे, नदीघाट आणि ऐतिहासिक बारवांची स्वच्छता करावी.

रोजगार व नवसंशोधन: कौशल्य व रोजगार विभागाने तरुण, नवउद्योजक (स्टार्टअप्स) आणि ग्रामीण संशोधकांसाठी ‘इनोव्हेशन चॅलेंज’ आयोजित करावे.

शिक्षण व बालविकास: शिक्षण विभागाने शाळांमध्ये ‘विकसित भारत’ संकल्पनेवर आधारित चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन भरवावे. तसेच बालविकास अधिकाऱ्यांनी महिलांसाठी आरोग्य-पोषण शिबिरे आणि मुलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम घ्यावेत.

जनजागृती व उपक्रम: कलापथक, पथनाट्यांद्वारे योजनांची माहिती पोहोचवावी. लाभार्थ्यांच्या घरी ‘आशीर्वादाचा दीप’ प्रज्वलित करावा व ‘मानवी रांगोळी’चे आयोजन करावे.

शासनाच्या या महत्त्वाकांक्षी अभियानात समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग नोंदवत, समन्वयाने काम करून रत्नागिरी जिल्ह्याचा ठसा उमटवावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी शेवटी केले.