रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांच्या स्वाक्षरीनंतर होणार कायद्यात रूपांतर
Trump Tariff on India बाबत एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. अमेरिकेच्या संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या ‘प्रतिनिधी सभेने’ (House of Representatives) रशियाकडून सर्वाधिक कच्चे तेल खरेदी करणाऱ्या देशांवर १०० टक्क्यांपर्यंत आयात शुल्क (टॅरिफ) लादण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. या विधेयकाच्या बाजूने २६२ तर विरोधात १५९ मते पडली. हे विधेयक आता मंजुरीसाठी व्हाईट हाऊसकडे पाठवले जाणार असून, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या स्वाक्षरीनंतर याचे कायद्यात रूपांतर होईल.
Trump Tariff on India: विधेयकाचे स्वरूप आणि मुख्य तरतुदी
या विधेयकाचे अधिकृत नाव ‘लिंडसे ओ. ग्रॅहम सँक्शनिंग रशिया अँड इराण ॲक्ट ऑफ २०२६’ असे आहे.
यादीत ५ प्रमुख देश: सध्याच्या टॅरिफच्या यादीत भारत, चीन, स्लोव्हाकिया, हंगेरी आणि अझरबैजान यांचा समावेश आहे.
१८० दिवसांचे पुनर्मूल्यांकन: अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी (USTR) दर १८० दिवसांनी या देशांच्या यादीचा आढावा घेतील.
अतिरिक्त अधिकार: हे विधेयक अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना रशियन मालावर ५०० टक्क्यांपर्यंत शुल्क लावण्याचे अधिकार देते. तसेच १९९६ चा इराण निर्बंध कायदा २०३१ पर्यंत वाढवण्यात येणार आहे.
युरोपीय देशांना सूट: रशियाकडून १५ टक्क्यांपेक्षा कमी वायू खरेदी करणाऱ्या आणि अवलंबित्व कमी करणाऱ्या १५ युरोपीय देशांना यातून सवलत देण्यात आली आहे.
भारतावर अन् इंधनाच्या किमतींवर काय होणार परिणाम?
हे विधेयक कायद्यात रूपांतरित झाल्यास भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि व्यापारावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो:
भारतीय वस्तू महागणार: १०० टक्के शुल्कामुळे अमेरिकेत भारतीय वस्तू दुप्पट महाग होतील. यामुळे कापड (वस्त्रोद्योग), रत्ने-दागिने, अभियांत्रिकी वस्तू, चामड्याची उत्पादने, सागरी उत्पादने आणि रसायने यांची अमेरिकेतील मागणी घटू शकते.
इंधन दरात वाढीची शक्यता: अमेरिकेच्या दबावामुळे भारताने रशियाकडून स्वस्त तेल खरेदी बंद करून इतर देशांकडून महागडे तेल खरेदी केले, तर देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढू शकतात.
याशिवाय रशियाचे "शॅडो फ्लीट" (टँकर्सचे जाळे) आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित व्यवसायांवरही या कायद्यांतर्गत कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. आता ट्रम्प या विधेयकावर काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.













