मुंबई-गोवा महामार्गालगत उड्डाणपुलाशेजारी उघडकीस आली घटना; अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
चिपळूण (रत्नागिरी) : चिपळूण शहरातील वालोपे परिसरात मुंबई-गोवा महामार्गालगत उड्डाणपुलाशेजारी एका ३३ वर्षीय तरुणाचा डोक्यात जांभा दगडाने किंवा इतर हत्याराने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. नवनाथ बबन कांबळे (वय ३३ वर्षे) असे मृताचे नाव असून, याप्रकरणी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रात्रीच्या सुमारास घडला हत्येचा थरार :
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत नवनाथ बबन कांबळे (वय ३३ वर्षे, मूळ रा. मु.पो. वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली; सध्या रा. वालोपे चिपळूण रेल्वे कॉलनी, ता. चिपळूण) हे वालोपे रेल्वे कॉलनी येथे वास्तव्यास होते. दिनांक १६ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८.१५ वाजल्यापासून ते १७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजेच्या दरम्यान, वालोपे देऊळवाडी येथील मुंबई-गोवा हायवे रोड लगत उड्डाणपुलाशेजारी, झोलाई जनरल स्टोअर्सच्या मागे (चिपळूण रेल्वेस्टेशन फाट्याजवळ) कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून नवनाथ कांबळे यांच्या डोक्यात जांभा दगडाने किंवा इतर कोणत्यातरी धारदार वा टणक हत्याराने जोरदार वार करून त्यांचा खून केला.

अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद :
सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी मयताचे मेहुणे विकास भागवत गायकवाड (वय ५१ वर्षे, व्यवसाय- नोकरी, रा. वालोपे चिपळूण रेल्वे कॉलनी, चिपळूण) यांनी मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १.४३ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून चिपळूण पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५८/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस अज्ञात मारेकऱ्याचा कसून शोध घेत आहेत.













