कार्तिकी एकादशी जत्रेच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण मंदिरात पोलीस व व्यापाऱ्यांची बैठक; फटाके विक्रीसाठी केवळ आठवडा बाजार येथील मोकळ्या जागेतच परवानगी
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील मुख्य बाजारपेठेत आणि गर्दीच्या ठिकाणी अनधिकृतपणे फटाक्यांचे स्टॉल लावणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करून थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी दिला आहे. येत्या शनिवारी कार्तिकी एकादशीनिमित्त रत्नागिरी शहरात भरणारी मोठी जत्रा आणि बाजारपेठेतील संभाव्य गर्दी लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी हे कठोर पाऊल उचलले आहे.
राधाकृष्ण मंदिरात पोलीस आणि व्यापाऱ्यांची बैठक :
कार्तिकी एकादशीच्या जत्रेच्या नियोजनासंदर्भात आज दुपारी १२ वाजता शहरातील श्री राधाकृष्ण मंदिरात पोलीस प्रशासन आणि व्यापाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन व सूचना देताना पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी फटाका विक्रीबाबत प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली.

केवळ आठवडा बाजार मैदानातच अधिकृत परवानगी :
पोलीस निरीक्षक पाटील यांनी स्पष्ट केले की, प्रशासनाकडून फटाके विक्रीसाठी अधिकृत परवाने हे केवळ आठवडा बाजार येथील मोकळ्या जागेत देण्यात आले आहेत. असे असतानाही काही व्यापारी मुख्य बाजारपेठेत व गर्दीच्या ठिकाणी फटाके विक्री करताना निदर्शनास येत आहेत. यातून मोठा अपघात किंवा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जत्रेत फटाक्यांचे स्टॉल आढळल्यास थेट गुन्हा दाखल :
गर्दीच्या ठिकाणी फटाक्यांचे कोणतेही स्टॉल लावू नयेत, अशा सक्त सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. कार्तिकी एकादशीच्या जत्रेदरम्यान किंवा मुख्य बाजारपेठेत कोठेही अनधिकृत फटाक्यांचे स्टॉल आढळून आल्यास संबंधित व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांच्याविरुद्ध थेट गुन्हे दाखल केले जातील, असा सज्जड इशारा पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी दिला आहे.













