Pavitra Portal Counselling: रत्नागिरी जिल्हा परिषदेतील ४५७ उमेदवारांचे आज समुपदेशन, प्रक्रियेनंतर मिळणार नियुक्ती पत्रे

Pavitra Portal Counselling: रत्नागिरी जिल्हा परिषदेतील ४५७ उमेदवारांचे आज समुपदेशन, प्रक्रियेनंतर मिळणार नियुक्ती पत्रे

लोकनेते शामराव पेजे सभागृहात रंगणार प्रक्रिया; जिल्ह्याला मिळणार नवे गुरुजी

Pavitra Portal Counselling प्रक्रियेअंतर्गत रत्नागिरी जिल्हा परिषदेला मिळालेल्या ४५७ उमेदवारांचे समुपदेशन २४ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या लोकनेते शामराव पेजे सभागृहात पार पडणार आहे. सकाळी ९ वाजता सुरू होणारी ही प्रक्रिया सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे. प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने या प्रक्रियेची सर्व तयारी पूर्ण झाली असून उमेदवारांनी दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. या प्रक्रियेमुळे रत्नागिरी जिल्ह्याला लवकरच नवे शिक्षक मिळणार आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यासाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून एकूण ४७८ शिक्षक मिळाले होते. शिक्षण विभागाच्या वतीने सलग तीन दिवस सर्व उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीदरम्यान २१ उमेदवारांनी अनुपस्थिती दर्शवल्यामुळे उर्वरित ४५७ उमेदवारांचे समुपदेशन निश्चित करण्यात आले. हे समुपदेशन मूळ वेळापत्रकानुसार २२ सप्टेंबर रोजी होणार होते.

शिक्षक संघटनांनी पदवीधर शिक्षकांची अडचण आणि त्यांच्या सोयीच्या ठिकाणी समायोजन करण्याची मागणी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती. या मागणीचा विचार करून पालकमंत्र्यांनी समुपदेशनाला दोन दिवसांची स्थिगीती दिली होती. या स्थगितीनंतर आता गुरुवारी २४ सप्टेंबर रोजी हे समुपदेशन होत असून प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही उमेदवार वगळता उर्वरित सर्वांना लगेचच नियुक्ती पत्रे दिली जाणार आहेत.

Mahrashi karve ANM

असे आहे Pavitra Portal Counselling वेळापत्रक
शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, समुपदेशनाची वेळ तीन सत्रांमध्ये विभागण्यात आली आहे:

सत्र पहिले (सकाळी ९ ते दुपारी १२ वाजता):

२०२२ मधील उपशिक्षक, पदवीधर गणित व विज्ञान उमेदवार (मराठी आणि उर्दू माध्यम). तसेच मराठी माध्यमातील पदवीधर (विज्ञान व गणित) दिव्यांग, महिला व पुरुष उमेदवार.

सत्र दुसरे (दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत):

उर्दू माध्यमातील सर्व पदवीधर (गणित-विज्ञान) व उपशिक्षक (दिव्यांग, महिला व पुरुष उमेदवार).

सत्र तिसरे (दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत):

मराठी माध्यमातील सर्व उपशिक्षक (दिव्यांग, महिला व पुरुष उमेदवार).

पार्श्वभूमी आणि जिल्हा परिषद परिसरातील वातावरण
समुपदेशन प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर, २४ सप्टेंबरपासून जिल्ह्याला नवे शिक्षक मिळणार असल्याने उमेदवारांमध्ये उत्सुकता आहे. प्रक्रियेच्या एक दिवसापूर्वीपासूनच उमेदवारांनी जिल्हा परिषदेत गर्दी करण्यास सुरुवात केली होती. उमेदवार सभागृह आणि वेळापत्रकाची पाहणी करत असून काही शंका असल्यास शिक्षण विभागात चौकशी करत असल्याचे दिसून आले.