राज्य शासनाचा अधिकृत निर्णय; महसूल विभागाकडून शासन निर्णय जारी, पुढील १५ दिवसांत कामकाजाचा अहवाल सादर करण्याचे आदेश
पाचल :
दापोली अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यास राज्य शासनाने अधिकृत मंजुरी दिली असून महसूल विभागाने या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय जारी केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील उत्तर भागात येणाऱ्या नागरिकांची अनेक वर्षांची प्रतीक्षा या निर्णयामुळे अखेर संपली आहे. प्रशासकीय आणि महसुली कामकाजासाठी नेहमी रत्नागिरी मुख्यालयाची पायपीट करणाऱ्या दापोली, खेड आणि मंडणगड या तीन तालुक्यांतील जनतेला या निर्णयामुळे थेट प्रशासकीय दिलासा मिळाला आहे.
उत्तर रत्नागिरीसाठी स्वतंत्र प्रशासकीय रचना

रत्नागिरी जिल्ह्याचा मोठा भौगोलिक विस्तार, वाढती लोकसंख्या आणि वेगाने होणारे शहरीकरण लक्षात घेता उत्तर रत्नागिरीतील नागरिकांना महसूलविषयक कामांसाठी जिल्हा मुख्यालयाचे मोठे अंतर पार करावे लागत होते. नागरिकांची हीच गैरसोय दूर करून प्रशासन अधिक लोकाभिमुख करणे आणि शासकीय योजनांची तळागाळापर्यंत प्रभावी अंमलबजावणी करणे हा या कार्यालय स्थापनेमागचा मुख्य उद्देश आहे. नव्या रचनेनुसार दापोली, खेड आणि मंडणगड हे तीन तालुके दापोली अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहेत. तर रत्नागिरी, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर (देवरुख), लांजा आणि राजापूर या उर्वरित सहा तालुक्यांचा कारभार पूर्ववत रत्नागिरी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत सुरू राहणार आहे.
दापोली अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय: प्रशासकीय नियंत्रण आणि अधिकारी पदे
नव्याने निर्माण करण्यात आलेल्या दोन्ही अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांचे प्रतिवेदन अधिकारी म्हणून रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आणि नियंत्रक अधिकारी म्हणून कोकण विभागीय आयुक्त कामकाज पाहणार आहेत. प्रशासकीय अधिकारांचा विचार करता, दापोलीच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना कार्यालय प्रमुख तसेच आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्यात आले आहे. याशिवाय, अप्पर जिल्हाधिकारी व तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना थेट शासनस्तरावरून केली जाईल, तर इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती उपलब्ध मनुष्यबळातून जिल्हाधिकारी स्तरावर तात्काळ करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
१५ दिवसांत अहवाल; तात्पुरत्या जागेत लवकरच कामकाज
कार्यालयाचे कामकाज तातडीने सुरू व्हावे यासाठी प्रारंभी तात्पुरत्या जागेची निश्चिती केली जाणार आहे. त्यानंतर कायमस्वरूपी जागेचा शोध घेऊन नवीन इमारतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. या सर्व प्रशासकीय व पायाभूत सुविधांची पूर्तता करून पुढील १५ दिवसांत शासनास अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यानंतर प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार आहे. दापोलीत हे कार्यालय सुरू झाल्यामुळे उत्तर रत्नागिरीतील शेतकरी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांचे महसुली प्रश्न स्थानिक पातळीवर जलद गतीने निकाली निघण्यास मदत होणार आहे.













