पारंपरिक मच्छीमारांच्या तक्रारीनंतर कारवाई तीव्र; ‘सानिया हाप्सा’, ‘एच. सिमक’ आणि ‘गुरुप्रसाद’ नौकांवर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू
रत्नागिरी :
रत्नागिरी मासेमारी कारवाई अंतर्गत मत्स्य व्यवसाय विभागाने बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या नौकांविरोधात समुद्रात धडक मोहीम हाती घेतली आहे. मंगळवारी रात्री घातलेल्या गस्तीदरम्यान मत्स्य विभागाने नियमबाह्यपणे मासेमारी करणाऱ्या तीन नौकांवर कारवाईचा बडगा उचलला. यामध्ये एका अत्याधुनिक एलईडी दिव्यांचा वापर करणाऱ्या नौकेचा आणि म्हाकुळ (स्क्वीड जिगींग) पकडणाऱ्या दोन नौकांचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या या तिन्ही नौकांवर सागरी कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
पारंपरिक मच्छीमारांच्या तक्रारीनंतर प्रशासकीय हालचाली

जिल्ह्याच्या सागरी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांच्या उपजीविकेवर गदा येत होती. याविरोधात स्थानिक मच्छीमारांनी तीव्र एल्गार पुकारत मत्स्य व्यवसाय विभागासह मत्स्य व बंदर विकासमंत्री नितेश राणे यांच्याकडे थेट तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत प्रशासनाकडून सागरी गस्त आणि तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.
रत्नागिरी मासेमारी कारवाई: गस्तीदरम्यान पकडलेल्या नौकांचा तपशील
मंगळवारी रात्री रत्नागिरीजवळील समुद्रात गस्त सुरू असताना मत्स्य विभागाच्या पथकाने म्हाकुळ पकडणाऱ्या दोन स्क्वीड जिगींग नौकांना रंगेहाथ पकडले. यामध्ये सिकंदर जैनुद्दीन फणसोपकर यांच्या मालकीची ‘सानिया हाप्सा’ (आयएनडी-एमएच-०४-एमएम-३८५१) आणि सुलताना अख्तर होडेकर यांच्या मालकीची ‘एच. सिमक’ (आयएनडी-एमएच-०४-एमएम-६०१) या दोन नौकांचा समावेश आहे. या दोन्ही नौका रात्रीच्या वेळी नियमबाह्य मासेमारी करत असल्याचे गस्तीदरम्यान आढळून आले.
भाट्ये खाडीतील कर्ला जेटीवर एलईडी नौकेवर छापा
समुद्रातील कारवाईसोबतच किनाऱ्यावरील जेटींचीही तपासणी मोहीम राबवण्यात आली. शहरानजीक असलेल्या भाट्ये खाडीतील कर्ला जेटीवर तपासणी करत असताना ‘गुरुप्रसाद’ (आयएनडी-एमएच-०४-एमएम-३७६६) नावाची नौका आढळून आली. ही नौका सुगंधा सुरेश ताकले यांच्या मालकीची असून तीवर प्रतिबंधित एलईडी दिवे बसवण्यात आले होते. या नौकेवरही सागरी नियमानुसार तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही समुद्रात, जेटीवर आणि बंदर परिसरात अशीच कडक तपासणी सुरू राहील, असा इशारा मत्स्य विभागाने दिला आहे.













