जेसीबी आणि क्रेनच्या साहाय्याने धडक कारवाई; बंदर परिसरातील अतिक्रमण अन् वाहतुकीचे अडथळे दूर
रत्नागिरी :
रत्नागिरी मिरकरवाडा बंदर कारवाई अंतर्गत मत्स्य व्यवसाय विभागाने बुधवारी सकाळी मोठी स्वच्छता आणि अतिक्रमणविरोधी मोहीम राबवली. जिल्ह्यातील सर्वात मोठे बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरकरवाडा बंदरात अनेक दिवसांपासून पडून असलेल्या मोडतोड झालेल्या नौका, लहान डिंगी बोटी आणि भंगार सामानाचे गोदाम बनलेल्या केबीन हटवण्यात आल्या आहेत. मत्स्य व्यवसाय व बंदर विकासमंत्री नितेश राणे यांनी बंदरे स्वच्छ व सुरक्षित ठेवण्याचे स्पष्ट निर्देश दिल्यानंतर विभागाने ही धडक मोहीम हाती घेतली.
वारंवार नोटिसा देऊनही दुर्लक्ष केल्याने अखेर कारवाई

पावसाळ्यात मासेमारी बंद असतानाच्या काळातच मत्स्य व्यवसाय विभागाकडून संबंधित मच्छीमारांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आठ दिवसांपूर्वी पुन्हा ३० मच्छीमारांना नोटीस बजावण्यात आली होती. यातील १२ ते १५ मच्छीमारांनी स्वतःहून आपल्या डिंगी बोटी व केबीन हटवल्या, परंतु १५ डिंगी बोटी व केबीन तसेच ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे अखेर प्रशासनाला कारवाईचा बडगा उचलावा लागला.
रत्नागिरी मिरकरवाडा बंदर कारवाई: प्रशासकीय अधिकारी आणि अंमलबजावणी
बुधवारी सकाळी ८ वाजल्यापासून रत्नागिरीचे मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त जीवन सावंत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जेसीबी आणि क्रेनच्या मदतीने बंदर स्वच्छतेची मोहीम सुरू केली. दुपारपर्यंत जेटीवर ठेवण्यात आलेल्या बहुतांश डिंगी बोटी आणि केबीन हटवून रस्ता मोकळा करण्यात आला. या संपूर्ण मोहिमेत नगर परिषद प्रशासनाने मत्स्य व्यवसाय विभागाला मोठे सहकार्य केले आहे. जेटीवर आणि बंदर परिसरात अशा प्रकारे ठेवलेल्या केबीन व बोटींमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता.
"मिरकरवाडा जेटीवर ठेवण्यात आलेल्या नौकांची केबीन व डिंगी बोटी दुपारपर्यंत हटवण्यात आल्या आहेत. शिल्लक केबीन मालकांना नोटिसा बजावल्या जाणार असून, त्यांनी त्या नौका न हटवल्यास मत्स्य व्यवसाय विभागाकडून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल."
— जीवन सावंत (सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त, रत्नागिरी)













