शहर पोलिसांची पाण्याच्या टाकीजवळ धडक कारवाई; ६० हजारांचे ब्राऊन हेरॉईन आणि ९० हजारांची दुचाकी जप्त
रत्नागिरी :
रत्नागिरी अमली पदार्थ कारवाई अंतर्गत शहर पोलिसांनी बेकायदेशीर अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात मोठी कारवाई करत एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे. मुरुगवाडा-पांढरा समुद्र परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ ही कारवाई करण्यात आली. संशयिताकडून अमली पदार्थासह वापरण्यात आलेली दुचाकी असा एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
संशयिताकडून ६० हजार रुपयांचे ब्राऊन हेरॉईन जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. २२) दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास मुरुगवाडा-पांढरा समुद्र परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ एक तरुण संशयास्पदरित्या थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी धाड टाकून ऋषिकेश संतोष चव्हाण (वय २२, रा. भैरी मंदिराजवळ, मुसळवाडा, रत्नागिरी) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ब्राऊन हेरॉईन हा घातक अमली पदार्थ आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या ब्राऊन हेरॉईनचे निव्वळ वजन ३ ग्रॅम असून त्याची बाजारभावानुसार किंमत ६० हजार रुपये आहे. अमली पदार्थ ठेवण्यासाठी वापरण्यात आलेल्या पारदर्शक प्लास्टिक पिशव्याही पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
रत्नागिरी अमली पदार्थ कारवाई: दुचाकीसह जप्त केलेला मुद्देमाल आणि पोलिसांचे पथक
अमली पदार्थाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ९० हजार रुपये किमतीची सुझुकी कंपनीची पांढऱ्या रंगाची दुचाकी (क्र. एमएच ०८ बीएल ५५१३) आणि तिची चावी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. जप्त करण्यात आलेला अमली पदार्थ आणि दुचाकी मिळून एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अरांक्षा यादव (भा.पो.से.), परीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अभिजीत थोरात आणि पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
शहर पोलिसांत गुन्हा दाखल; अधिक तपास सुरू
या प्रत्यक्ष कारवाई पथकात पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, सहाय्यक पोलीस फौजदार दीपक साळवी, पोलीस हवालदार शांताराम झोरे, दिनेश आखाडे, भालचंद्र मयेकर, तसेच पोलीस कॉन्स्टेबल अमित पालवे आणि निलेश शिंगवे यांचा समावेश होता. या प्रकरणी पोलीस हवालदार दिनेश आखाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी रात्री ११:१५ वाजण्याच्या सुमारास शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अवैध धंद्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा अधिक तपास शहर पोलीस अमलदार करत आहेत.













