वडिलांच्या डोक्यात कुऱ्हाडीचे सपासप वार, आईच्या डोक्यात फोडली काचेची बाटली; जालगाव पांगारवाडीतील धक्कादायक घटना
दापोली : दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून पोटच्या मुलाने जन्मदात्या आई-वडिलांवर काचेची बाटली आणि कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची थरारक घटना समोर आली आहे. दापोली तालुक्यातील जालगाव पांगारवाडी येथे घडलेल्या या गंभीर घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, दापोली पोलीस ठाण्यात संशयित मुलाविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारूसाठी पैसे नाकारल्याने मुलाचा संताप :
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जालगाव पांगारवाडी येथील रहिवासी अनिता उर्फ निर्मला मधुकर आग्रे (वय ६० वर्षे) या २३ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास घरात उपस्थित होत्या. त्यांचा मुलगा सुनिल मधुकर आग्रे (वय ४१ वर्षे) याने दारू पिण्यासाठी आईकडे पैशांची मागणी केली. मात्र, आईने पैसे देण्यास नकार दिल्याने सुनिलचा पारा चढला. त्याने घरातून उजव्या हातात कुऱ्हाड आणि डाव्या हातात काचेची बाटली घेऊन "तुम्हाला आता जिवंत सोडणार नाही, ठार मारून टाकतो" अशी धमकी देत आई-वडिलांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

आईच्या डोक्यात बाटली, वडिलांवर कुऱ्हाडीने वार :
अनिता आग्रे या तोंड धुण्यासाठी जात असताना सुनिलने त्यांना अडवले आणि डाव्या हातातील काचेची बाटली थेट त्यांच्या डोक्यात मारून त्यांना रक्तबंबाळ केले. त्यानंतर हातातील कुऱ्हाड आईवर उगारत तो पडवीत बसलेले त्याचे वडील मधुकर नारायण आग्रे (वय ६५ वर्षे) यांच्या दिशेने धावला. संशयिताने कोणतीही दयामाया न दाखवता हातातील धारदार कुऱ्हाडीने वडिलांच्या डोक्यात आणि हातावर सपासप वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या जीवघेण्या हल्ल्यात वृद्ध दांपत्य गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत.
दापोली पोलिसांत गुन्हा दाखल :
या हल्ल्याप्रकरणी जखमी आई अनिता आग्रे यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपी मुलगा सुनिल आग्रे याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम १०९(१) (खुनाचा प्रयत्न), ३५१(३) आणि ३५२ अन्वये गु.र.नं. २०७/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.













