सत्यनारायण पूजेदरम्यान गर्दीचा फायदा घेऊन ४० हजारांचे ताम्हण लंपास; मारुती मंदिर सर्कल येथील घटना
रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर सर्कल येथील प्रसिद्ध ‘श्री रत्नागिरीचा राजा’ या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपातून पूजेसाठी ठेवलेले मौल्यवान चांदीचे ताम्हण अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सत्यनारायण पूजेदरम्यान चोरट्यांचा डल्ला :
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती मंदिर सर्कल येथे ‘श्री रत्नागिरीचा राजा’ गणेशोत्सव मंडळातर्फे २३ सप्टेंबर रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती. सकाळी १०.३० ते १०.४५ च्या सुमारास मंडपात भाविकांची मोठी गर्दी जमलेली असताना, बाप्पाच्या स्थापनेसमोरील भागात पूजेसाठी ठेवलेले सुमारे ४०० ग्रॅम वजनाचे चांदीचे ताम्हण ठेवण्यात आले होते. या दरम्यान एका अज्ञात चोरट्याने मंडपातील गर्दीचा आणि गोंधळाचा गैरफायदा घेत सुमारे ४० हजार रुपये किमतीचे हे चांदीचे ताम्हण लबाडीच्या इराद्याने लंपास केले.

मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून पोलिसांत तक्रार :
पूजेच्या विधीदरम्यान चांदीचे ताम्हण जागेवर नसल्याचे निदर्शनास येताच मंडपात एकच खळबळ उडाली. मंडप परिसरात शोधाशोध करूनही ताम्हण मिळून आले नाही. अखेर मंडळाचे पदाधिकारी तथा व्यापारी अमरेश सुरेश पावसकर (वय ४४ वर्षे, रा. शंखेश्वर मधुबन, बोर्डिंग रोड, माळनाका, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अधिकृत फिर्याद नोंदवली.
रत्नागिरी शहर पोलिसांत गुन्हा नोंद :
फिर्यादी अमरेश पावसकर यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३(२) अन्वये गु.र.नं. ३६७/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. मंडपातील सीसीटीव्ही फुटेज आणि परिसरातील हालचालींची तपासणी करून पोलीस त्या अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत.













