घरात घुसून तरुणाला काठीने बेदम मारहाण व जीवे मारण्याची धमकी; मंडणगडच्या कादवण येथील दोघांवर गुन्हा दाखल

घरात घुसून तरुणाला काठीने बेदम मारहाण व जीवे मारण्याची धमकी; मंडणगडच्या कादवण येथील दोघांवर गुन्हा दाखल

मारहाण व धमकीच्या भीतीपोटी तरुणाने केले विषप्राशन; उपचारासाठी दाखल

मंडणगड : मंडणगड तालुक्यातील कादवण येथे घरात घुसून एका तरुणाला लाकडी काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या मारहाणीमुळे आणि धमकीच्या दहशतीपोटी घाबरलेल्या तरुणाने जनावरांचे औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरात घुसून मोबाईल हिसकावला आणि केली बेदम मारहाण :

मिळालेल्या माहितीनुसार, कादवण येथील रहिवासी सुरज संभाजी सोंडकर (वय २७ वर्षे) हा १८ सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी होता. त्यावेळी गावातीलच मिलिंद सोंडकर (वय ३५ वर्षे) आणि मनोज सोंडकर (वय ४१ वर्षे) हे दोघे जबरदस्तीने फिर्यादी अनुसया संभाजी सोंडकर यांच्या घरात शिरले. त्यांनी सुरजचा मोबाईल हिसकावून घेत "माझ्या बायकोचे फोटो का काढले आहेत, तिच्याशी तुझा काय संबंध आहे?" असा जाब विचारत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांनी मिळून सुरजला लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी काठीने बेदम मारहाण करून जखमी केले, तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

Infigo Eyecare

भीतीपोटी तरुणाने केले विषप्राशन :

आरोपींनी घरात येऊन केलेली बेदम मारहाण आणि दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकीमुळे सुरज प्रचंड मानसिक तणावाखाली आला होता. या भीतीपोटी त्याने दुसऱ्या दिवशी म्हणजेच १९ सप्टेंबर रोजी घरी म्हशींना दिले जाणारे विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रकृती खालावल्याने त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मंडणगड पोलिसांत गुन्हा नोंद :

या घटनेबाबत सुरुवातीला ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा (क्र. ००६/२०२६) दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो वर्ग होऊन मंडणगड पोलीस ठाण्यात प्राप्त झाला. जखमी तरुणाची आई अनुसया सोंडकर (वय ४५ वर्षे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंडणगड पोलिसांनी संशयित आरोपी मिलिंद सोंडकर आणि मनोज सोंडकर यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम ११८(१), ३५२ आणि ३(५) अन्वये गु.र.नं. ११९/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास मंडणगड पोलीस करत आहेत.