एकाच दिवशी १४९ जादा गाड्या सोडून एसटीने दिला दिलासा; स्थानिक संस्था, नगर परिषद आणि पोलिसांचेही मोलाचे सहकार्य
राजापूर :
राजापूर एसटी आगार गणेशोत्सव प्रवासाच्या नियोजनांतर्गत राजापूर एसटी आगाराने मुंबईकर गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. आगाराने एकाच दिवशी तब्बल १४९ जादा गाड्या मुंबईसह विविध मार्गांवर सोडल्या आहेत. याशिवाय येत्या २१ ते २६ सप्टेंबर या कालावधीत आणखी ६५ जादा गाड्या सोडण्याचे नेटके नियोजन राजापूर एसटी आगाराकडून करण्यात आले असून यामुळे मुंबईकडे परतणाऱ्या गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एकाच दिवशी १४९ जादा गाड्यांचा गतीमान कारभार

यावर्षी शनिवारी गौरी-गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर रविवारी मुंबईकडे परतणाऱ्या प्रवाशांची एसटी स्थानकांवर मोठी गर्दी झाली होती. अनेक प्रवाशांनी ग्रुप आरक्षणाच्या माध्यमातून आगाऊ गाड्या आरक्षित केल्या होत्या. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन राजापूर आगारातून मुंबई, परेल, बोरीवली, ठाणे, कल्याण, भिवंडी, भांडुप, भाईंदर, विरार, नालासोपारा आणि विठ्ठलवाडी आदी मार्गांवर १४९ जादा गाड्या सोडण्यात आल्या. आगार प्रमुख काव्या पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आगार अधिकारी, कर्मचारी, तांत्रिक कार्यशाळेतील कर्मचारी, चालक व वाहकांनी अथक मेहनत घेऊन हे नियोजन यशस्वी केले.
राजापूर एसटी आगार गणेशोत्सव: २१ ते २६ सप्टेंबरदरम्यान ६५ अतिरिक्त बस गाड्या
मुंबईकर गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासासाठी २१ ते २६ सप्टेंबर या कालावधीत आणखी ६५ जादा गाड्या विविध मार्गांवर धावणार आहेत. २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असून १२ दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. त्यानंतरही मुंबईकडे परतणाऱ्या भक्तांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने २५ व २६ सप्टेंबर रोजी विशेष जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
स्थानिक संस्था आणि प्रशासनाचे मोलाचे सहकार्य
या महाकाय वाहतूक नियोजनात तालुक्यातील विविध संस्थांनी राजापूर एसटी आगाराला मोलाचे सहकार्य केले. गणेशोत्सवाच्या प्रारंभी गाड्या उभ्या करण्यासाठी ‘बज्मे उर्दू अदब’ या संस्थेने रानतळे येथील इंग्रजी माध्यम प्रशालेचे मैदान उपलब्ध करून दिले. तसेच बाहेरील आगारांतून आलेल्या चालक-वाहकांच्या निवासासाठी ‘राजापूर शिक्षण प्रसारक मंडळा’ने राजापूर हायस्कूलमध्ये खोल्या उपलब्ध करून दिल्या. यासोबतच राजापूर नगर परिषद आणि राजापूर पोलिसांनीही वाहतूक नियंत्रणात मोलाचा सहभाग नोंदवला आहे.













