Raj Thackeray Election Commission: राज ठाकरेंचा भाजप आणि निवडणूक आयोगावर निशाणा; ‘पहिली लढाई निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात, तर पुढचा टप्पा ईव्हीएमविरुद्ध’

Raj Thackeray Election Commission: राज ठाकरेंचा भाजप आणि निवडणूक आयोगावर निशाणा; 'पहिली लढाई निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात, तर पुढचा टप्पा ईव्हीएमविरुद्ध'

निवडणूक आयोग भाजपच्या अधीन; सर्व विरोधी पक्षांनी बॅलेट पेपरवर निवडणुकांसाठी जनआंदोलन उभं करावं, मनसे अध्यक्षांचे आवाहन

मुंबई :

राज ठाकरे निवडणूक आयोग आणि भाजप सरकारवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून जोरदार हल्लाबोल केला आहे. "पहिली लढाई ही निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात असून ती अधिक ताकदीने व एकजुटीने करावी लागेल. आयोगाला हाताशी धरून ‘एसआयआर’ आणि मतदार याद्यांमध्ये घोटाळे करून भाजपने निवडणुका कशा जिंकल्या हे आता उघड झाले आहे. आता यातील पुढचा टप्पा हा ईव्हीएमच्या विरोधात लढण्याचा आहे," अशी घणाघाती टीका राज ठाकरे यांनी केली आहे.

ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरसाठी जनआंदोलनाची गरज

Tata sierra

स्वायत्त नसलेला निवडणूक आयोग आणि ईव्हीएम ही दोन अस्त्रे भाजप सरकारची प्रमुख हत्यारे बनली आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. या पार्श्वभूमीवर देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी मोठे जनआंदोलन उभे केले पाहिजे, अशी आर्त साद त्यांनी देशातील विरोधी पक्षांना घातली आहे.

राज ठाकरे निवडणूक आयोग: २ आयुक्तांच्या आक्षेपानंतर उठले वादळ
केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या एकाधिकारशाही आणि बेबंदशाहीविरोधात इतर दोन निवडणूक आयुक्तांनी लेखी आक्षेप नोंदवल्याचे वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर देशात मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर आयोगाने केलेला खुलासा अत्यंत केविलवाणा असून, उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नांवर त्यांनी चकार शब्दही काढलेला नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

"या कणाहीन आयोगाच्या जोरावर आलेला सरकारचा राजीनामा हवा"

राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये अत्यंत आक्रमक भूमिका मांडत म्हटले आहे की, "मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा तर व्हायलाच हवा, पण या असल्या कणाहीन निवडणूक आयोगाला हाताशी धरून जे सरकार निवडून आले आहे, त्यांनीही राजीनामा दिला पाहिजे. आम्ही बहुमताने निवडून आलो असे सांगणाऱ्या सरकारच्या निवडीनंतर रस्त्यावर कुठेही लोकांचा जल्लोष दिसला नव्हता, यातच सगळे स्पष्ट होते. निवडणूक आयोग स्वायत्त झाल्याशिवाय या सत्ताधाऱ्यांना जमिनीवर आणता येणार नाही."

आयोगाची स्वायत्तता केवळ पुस्तकापुरतीच सीमित

२०२५ च्या अखेरीस महापालिका निवडणुकांआधी विरोधी पक्षांचे नेते जेव्हा मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटायचे, तेव्हाच त्यांच्याकडे कोणतेही अधिकार उरले नसल्याचे जाणवले होते, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. "निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी जे आक्षेप नोंदवले आहेत, ते अतिशय गंभीर आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हे नाकारणे अशक्य आहे. त्यामुळे या सगळ्याच्या मागे नक्की कोणता ‘कर्ताकरविता’ आहे, हे स्पष्ट झाले तरी पुरेसे आहे," असा टोलाही त्यांनी लगावला.