Disha Salian Case Update: सतीश सालियन यांच्या नोटिशीला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर..

Disha Salian Case Update: सतीश सालियन यांच्या नोटिशीला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर..

१६ सप्टेंबरच्या पोस्टमध्ये सतीश सालियन यांचे नाव नाही; सीबीआय अधिकारी तपासासाठी मुंबईत दाखल, पेनड्राईव्ह सोपवण्याची शक्यता

मुंबई :

दिशा सालियन मृत्यू प्रकरण मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी सतीश सालियन यांनी पाठवलेल्या कायदेशीर नोटिशीला आपल्या वकिलांमार्फत अधिकृत उत्तर दिले आहे. सतीश सालियन यांनी केलेले सर्व आरोप आदित्य ठाकरेंनी पूर्णपणे फेटाळून लावले असून ते तथ्यहीन असल्याचे म्हटले आहे. आपली प्रतिमा मलीन करण्याच्या राजकीय हेतूने ही नोटीस पाठवण्यात आल्याचा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

"१६ सप्टेंबरच्या पोस्टमध्ये सतीश सालियन यांचे नाव नव्हते"

Shanti real estate 1

आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी दिलेल्या उत्तरात नमूद केले आहे की, १६ सप्टेंबर रोजी केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सतीश सालियन यांचे नाव कुठेही घेतलेले नव्हते. पोस्टमधील कोणतेही विशिष्ट वाक्य त्यांच्याकडे निर्देश करत नाही. राजकीय आणि माध्यमांच्या मोहिमेमुळेच सतीश सालियन यांचे नाव या प्रकरणाशी जोडण्याचा प्रयत्न होत आहे. संबंधित प्रकरणातील आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी स्वतः आदित्य ठाकरेंनी केली असून सतीश सालियन यांची बदनामी करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे वकिलांनी स्पष्ट केले आहे.

दिशा सालियन मृत्यू प्रकरण: सीबीआयची एन्ट्री आणि पेनड्राईव्हचा दावा
दरम्यान, दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या सखोल तपासासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाचे (CBI) अधिकारी दिल्लीहून मुंबईत दाखल झाले आहेत. या तपासाच्या पार्श्वभूमीवर सतीश सालियन सीबीआय अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एक महत्त्वाचा पेनड्राईव्ह सोपवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पेनड्राईव्हमध्ये काय असल्याचा दावा?

सतीश सालियन यांच्या दाव्यानुसार, या पेनड्राईव्हमध्ये एका प्रत्यक्षदर्शीचा व्हिडिओ जबाब आहे. या जबाबात आदित्य ठाकरे आणि इतर व्यक्तींचा घटनास्थळी सहभाग असल्याचा दावा करण्यात आल्याची माहिती आहे. याव्यतिरिक्त, इतर प्रत्यक्षदर्शी आणि महत्त्वाची माहिती असलेल्या व्यक्तींची माहितीही सीबीआयला दिली जाणार आहे. तसेच, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा जबाब नोंदवून त्यांनी केलेल्या दाव्यांची स्वतंत्र पडताळणी करण्याची मागणीही सतीश सालियन यांच्याकडून सीबीआयकडे केली जाणार आहे.