महालवितरणकडून स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित; लघुदाब, उच्चदाब व अतिउच्चदाब ग्राहकांना कृषी दरानुसार सवलत
रत्नागिरी :
मच्छीमार वीजदर सवलत देण्याच्या संदर्भात महावितरणकडून अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मच्छीमार आणि मत्स्य व्यावसायिकांना आता शेतकऱ्यांप्रमाणे कृषी दराने वीजदर सवलत मिळणार आहे. यासाठी महावितरणने स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित केली असून संबंधित पात्र लाभार्थ्यांना वाढत्या वीजखर्चाच्या भारापासून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
१६ फेब्रुवारी २०२६ रोजी महावितरणचे परिपत्रक

राज्य शासनाने मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महावितरणने १६ फेब्रुवारी २०२६ रोजी वाणिज्य परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या निर्णयानुसार मच्छीमार, मत्स्य संवर्धक, मत्स्य व्यावसायिक, मत्स्यकास्तकार तसेच मत्स्यबीज व मत्स्य वेडुकली संवर्धक यांना कृषी दराप्रमाणे वीजदर सवलत लागू करण्यात आली आहे. मात्र, मत्स्य प्रक्रिया उद्योग या सवलतीच्या कक्षेत समाविष्ट करण्यात आलेला नाही.
मच्छीमार वीजदर सवलत: नियम, अटी आणि अर्ज करण्याची पद्धत
स्वतंत्र वीजमीटर अन् NFDB नोंदणी बंधनकारक
सवलतीचा लाभ घेण्यासाठी मत्स्य व्यवसायासाठी वापरण्यात येणाऱ्या वीज जोडणीस स्वतंत्र वीजमीटर असणे आवश्यक आहे. पात्र लाभार्थ्यांनी स्वघोषणपत्रासह जिल्हास्तरावरील सहाय्यक आयुक्त (मत्स्य व्यवसाय) यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच, संबंधित मत्स्य व्यवसाय प्रकल्पाची नोंद राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळाच्या (NFDB) अंतर्गत असणे अनिवार्य असल्याचे महावितरणच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
गैरवापर केल्यास दंडात्मक कारवाई: वीजेचा गैरवापर झाल्यास आतापर्यंत देण्यात आलेली सवलतीची रक्कम दंडात्मक व्याजासह वसूल केली जाईल.
अवसायनातील प्रकल्पांना लाभ नाही: अवसायनात गेलेल्या (बंद पडलेल्या) प्रकल्पांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
कोकणातील मच्छीमारांना दिलासा: मत्स्य संवर्धन, मत्स्यतळी आणि पंपिंग व्यवस्थेसाठी होणारा मोठा वीजखर्च आता लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होईल.
महावितरणच्या परिपत्रकानुसार ही सवलत शासन निर्णयाच्या प्रभावी दिनांकापासून लागू होणार असून, पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित मत्स्य व्यवसाय कार्यालयाशी संपर्क साधून प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.













