Mumbai University New Courses: नवीन अभ्यासक्रम नोंदणीची सुविधा उपलब्ध करा; मुंबई विद्यापीठासाठी आमदार शेखर निकम यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Mumbai University New Courses: नवीन अभ्यासक्रम नोंदणीची सुविधा उपलब्ध करा; मुंबई विद्यापीठासाठी आमदार शेखर निकम यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ऑनलाइन पोर्टलवर लिंक उपलब्ध करून देण्याची मागणी; कोकणातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवरच आधुनिक शिक्षणाची संधी मिळण्याचा विश्वास

चिपळूण :

मुंबई विद्यापीठ नवीन अभ्यासक्रम नोंदणीसंदर्भात चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महत्त्वाची मागणी केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांसाठी नवीन अभ्यासक्रम नोंदणीची आवश्यक सुविधा ऑनलाइन पोर्टलवर तातडीने उपलब्ध करून देण्यात यावी, असे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केले आहे.

आधुनिक आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांवर भर

Aayurzil

महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील उच्च शिक्षणाचा विस्तार करणे आणि विद्यार्थ्यांना आवडीचे, आधुनिक व रोजगाराभिमुख शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाइन पोर्टलची सुविधा देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाने ‘Data Science & Sport Studies’, ‘Artificial Intelligence (AI) & Sports Analytics’ यांसारखे आधुनिक आणि रोजगाराच्या दृष्टीने उपयुक्त अभ्यासक्रम विकसित केले आहेत. तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्रीडा क्षेत्रातील बदलत्या संधी लक्षात घेता हे अभ्यासक्रम कोकणातील विद्यार्थ्यांना स्थानिक परिसरातच उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे आमदार निकम यांनी नमूद केले.

मुंबई विद्यापीठ नवीन अभ्यासक्रम: ऑनलाइन नोंदणी पोर्टलवर लिंक देण्याची मागणी
मुंबई विद्यापीठाने आपला अधिकृत बृहत् आराखडा (Perspective Plan) शासनाकडे सादर केलेला आहे. त्यानुसार विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना हे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुलभ व गतिमान होणे गरजेचे आहे. मात्र, सध्या ऑनलाइन पोर्टलवर मुंबई विद्यापीठासाठी आवश्यक लिंक व सुविधा उपलब्ध नसल्याने ती तातडीने सुरू करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

कोकणातील विद्यार्थ्यांचे स्थलांतर थांबण्यास मदत

कोकणातील ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मुंबई, पुणे किंवा अन्य मोठ्या शहरांमध्ये स्थलांतर करावे लागते. आर्थिक परिस्थिती, प्रवासाचा खर्च आणि निवासाच्या अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना इच्छेनुसार अभ्यासक्रम निवडणे शक्य होत नाही. गावाजवळच आधुनिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांचा मोठा फायदा होईल आणि स्थानिक पातळीवर कौशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केला.