९८ किलोमीटरच्या हरितक्षेत्र महामार्गासाठी DPR ची प्रक्रिया सुरू; NHAI कडून सल्लागार नियुक्तीची निविदा जाहीर
रत्नागिरी :
जयगड सातारा द्रुतगती मार्ग योजनेअंतर्गत कोकणातील महत्त्वाच्या जयगड बंदराला पश्चिम महाराष्ट्राशी थेट जोडण्यासाठी प्रस्तावित ‘जयगड-चिपळूण-सातारा हरितक्षेत्र द्रुतगती महामार्गाच्या’ (Greenfield Expressway) हालचालींना मोठा वेग आला आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) या सुमारे ९८ किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी ‘सविस्तर प्रकल्प अहवाल’ (DPR) आणि शक्यता अहवाल (Feasibility Report) तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्तीची निविदा प्रक्रिया अधिकृतपणे सुरू केली आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबतचा पुढील निर्णय लवकरच होणे अपेक्षित आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक पट्ट्याशी थेट कनेक्टिव्हिटी

जयगड बंदर-चिपळूण-सातारा असा हा प्रस्तावित द्रुतगती मार्ग सातारा येथे ‘NH-48’ ला जोडला जाणार आहे. केंद्र सरकारच्या नियोजन धोरणानुसार कोकणातील बंदरांना पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक व कृषी पट्ट्यांशी जलदगतीने जोडणे हा या प्रकल्पामागील प्रमुख उद्देश आहे. जयगड बंदरातून होणारी आयात-निर्यात आणि मालवाहतूक सातारा, पुणे तसेच पुढील मोठ्या बाजारपेठांपर्यंत अधिक वेगाने पोहोचवण्यासाठी या महामार्गाचा मोठा उपयोग होणार आहे.
जयगड सातारा द्रुतगती मार्ग: ९८ किमी मार्ग, रेल्वे जोडणी आणि नियोजन
३० सप्टेंबरपर्यंत निविदा सादर करण्याची मुदत
या प्रकल्पाचा मार्ग ९८ किलोमीटरचा असून डीपीआर व व्यवहार्यता अहवाल तयार करण्यासाठी सल्लागाराला २७० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या कामाची निविदा ३० सप्टेंबरपर्यंत सादर करता येणार असून १ ऑक्टोबरला त्या उघडल्या जातील. त्यानंतर प्रत्यक्ष आराखडा, तांत्रिक अभ्यास, पर्यावरणीय बाबी, भूसंपादन आणि बांधकामाच्या पुढील प्रक्रिया निश्चित होणार आहेत. सध्या हा प्रकल्प प्राथमिक नियोजन व डीपीआर तयार करण्याच्या टप्प्यात आहे.
जयगड बंदरासाठी रेल्वे जोडणीचा प्रस्तावही विचाराधीन
या प्रस्तावित महामार्गामुळे जयगड बंदर, चिपळूण आणि सातारा यांच्यातील दळणवळण सुधारण्यासोबतच मालवाहतूक, उद्योग, पर्यटन आणि कृषी उत्पादनांच्या वाहतुकीला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. चिपळूणला या मार्गामुळे भविष्यात महत्त्वाचे ‘लॉजिस्टिक्स हब’ म्हणून विकसित होण्याची मोठी संधी निर्माण होऊ शकते. दरम्यान, जयगड बंदराच्या रेल्वे जोडणीचा स्वतंत्र प्रस्तावही विचाराधीन आहे. महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक धोरणात ‘जयगड-वैभववाडी-कोल्हापूर’ रेल्वे जोडणीचा उल्लेख असून जयगड बंदरासाठी रेल्वे लाईन जोडण्याबाबतही चाचपणी सुरू आहे.













