ग्राहक पंचायतीत सहभागी व्हा : सत्यवान कोत्रे

ग्राहक पंचायतीत सहभागी व्हा : सत्यवान कोत्रे

रत्नागिरीत २७ सप्टेंबरला वार्षिक बैठक; ग्राहक चळवळ अधिक व्यापक करण्याचे आवाहन

रत्नागिरी : ग्राहक पंचायतीत सहभागी व्हा (Grahak Panchayat Ratnagiri) असे आवाहन ग्राहक पंचायतीचे कार्यवाह सत्यवान कोत्रे यांनी केले आहे. आजच्या काळात दैनंदिन खरेदीपासून ते विविध सेवांपर्यंत ग्राहकांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. वाहने, मोबाईल फोन, मोबाईल रिचार्ज यांपासून ते दररोज लागणाऱ्या सर्व वस्तूंची खरेदी आपण करत असतो. या खरेदीत होणारी भेसळ, वस्तूंचा अयोग्य दर्जा यांसारख्या वैयक्तिक समस्यांसोबतच अनेक सामुदायिक प्रश्नही उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी जागरूक होऊन चळवळीत योगदान देणे आवश्यक बनले आहे.

ग्राहक पंचायतीत सहभागी व्हा: वाढत्या फसवणुकीविरुद्ध ग्राहक चळवळ मजबूत करण्याचे आवाहन
रत्नागिरी जिल्ह्यात मागील सलग २५ वर्षांपासून ग्राहक पंचायत सक्रियपणे कार्यरत असून, विविध ग्राहककेंद्री प्रश्न तडीस नेण्याचे कार्य केले जात आहे. मात्र, सद्यस्थितीत सायबर फ्रॉड, विमा कंपन्यांकडून रास्त क्लेम नाकारले जाणे, पर्यटन मंडळांकडून होणारी फसवणूक तसेच गुंतवणूक कंपन्यांची फसवणूक यांसारख्या गंभीर बाबी समोर येत आहेत. या आव्हानांचा सामना करण्यासाठी व्यापक पातळीवर ग्राहक जागरूकता निर्माण करणे आणि न्यायासाठी एकत्र येऊन प्रयत्न करणे ही काळाची गरज ठरली आहे.

प्रशासकीय व न्यायालयीन मार्गाने मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील
सध्या ग्राहक पंचायत अशा विविध प्रश्नांना प्रशासकीय व न्यायालयीन मार्गाने सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रत्येक व्यक्ती ही कोणत्या ना कोणत्या रूपात ग्राहकच आहे. आपल्या अनुभवांच्या आधारे इतरांना सावध करण्यासाठी आणि योग्य न्यायासाठी सर्व ग्राहकांनी ग्राहक पंचायतीच्या चळवळीत सहभागी होऊन सभासद व्हावे, असे प्रतिपादन कार्यवाह सत्यवान कोत्रे यांनी केले.

Kore Mobile

२७ सप्टेंबर रोजी राणी लक्ष्मीबाई सभागृहात वार्षिक बैठक
ग्राहक पंचायतीची वार्षिक बैठक २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ‘राणी लक्ष्मीबाई सभागृह’, शेरे नाका, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली आहे. या ग्राहक चळवळीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व नागरिकांनी व ग्राहकांनी या बैठकीस आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन उपाध्यक्ष डॉ. शरद प्रभुदेसाई यांनी केले आहे.