Ratnagiri Rain Deficit: रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण घटले; वार्षिक सरासरीच्या तुलनेत ७७.७७ टक्के पाऊस

Ratnagiri Rain Deficit: रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण घटले; वार्षिक सरासरीच्या तुलनेत ७७.७७ टक्के पाऊस

गतवर्षाच्या तुलनेत ९८३ मिमी पावसाची घट; भात व नाचणीची पिके करपण्याची भीती, पाणी टंचाईचा धोका टळला

रत्नागिरी : जिल्ह्यात यंदा १ जून ते २४ सप्टेंबर २०२६ अखेर सरासरी २,६१६.४४ मिमी पावसाची नोंद झाली असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ७७.७७ टक्के राहिले आहे. गतवर्षी याच कालावधीत ३,५९९.६७ मिमी (१०७ टक्के) पाऊस झाला होता. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल ९८३ मिमी पाऊस कमी झाला आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ३,३६४.२२ मिमी इतकी असून, त्या तुलनेत अजूनही ७४७.७८ मिमी म्हणजेच सुमारे २२.२३ टक्क्यांची मोठी तूट कायम आहे.

मागील ५ वर्षांतील तुलना आणि मॉन्सूनचा प्रवास
कोकणाच्या इतिहासात २०२५ मध्ये सर्वाधिक पाऊस झाला होता. मागील वर्षी मे महिन्यातच पावसाने दमदार हजेरी लावली होती, तर जून आणि जुलैमध्ये मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले होते. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तीन तालुक्यांत पूरस्थिती निर्माण होऊन शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या द्याव्या लागल्या होत्या आणि कोट्यवधींचे नुकसान होऊन तब्बल ४,००० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली होती. मात्र, २०२३ नंतर २०२६ या वर्षी पावसाने मोठी ओढ दिली आहे. यंदा मॉन्सून वेळेवर दाखल झाला असला तरी तो काही दिवसच सक्रिय राहिला. जुलै महिन्यात एका आठवड्यात चांगला पाऊस होऊन जूनचा बॅकलॉक भरून निघाला, परंतु ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली आहे.

रत्नागिरी जिल्हा पाऊस तूट आणि शेतीवरील परिणाम
सुरुवातीला झालेल्या चांगल्या पावसामुळे जिल्ह्यात भात आणि नाचणीची पिके जोमात आली होती. परंतु, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे आता ही पिके पिवळी पडून करपू लागली आहेत. सध्या पिकांमध्ये दाणे भरण्याचा अत्यंत संवेदनशील काळ सुरू असून शेतात पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे यंदा भात पिकाचे उत्पादन लक्षणीय घटण्याची शक्यता कृषी विभागाकडून व्यक्त केली जात आहे.

Arihant 4

पाणी टंचाईचा धोका टळला पण बळीराजा चिंतेत
यंदा उन्हाळ्यात जिल्ह्याला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. त्यावेळी विविध वाड्या, वस्त्या आणि गावांमध्ये १८ हून अधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. सुदैवाने जून आणि जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे नद्या, नाले आणि धरणातील पाणी पातळी वाढल्याने सध्या पाणी संकट दूर झाले आहे. तरीही, ऐन काढणीच्या दिवसांत पावसाने मारलेल्या दडीमुळे बळीराजा मोठ्या आर्थिक चिंतेत सापडला आहे.