कच्च्या आणि शुद्ध सोयाबीन, पाम तसेच सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क घटले; सणांच्या काळात दर नियंत्रणात राहण्यास मदत होणार
Edible Oil Import Duty Cut: ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या वाढलेल्या किंमती आटोक्यात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कच्च्या आणि शुद्ध खाद्यतेलावरील आयात शुल्कात मोठी कपात केली आहे. ही कपात २४ सप्टेंबरपासून त्वरित लागू करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली असून, यामुळे सर्वसामान्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
सणासुदीच्या काळात ग्राहकांना दिलासा
भारत हा खाद्यतेलाचा जगातील सर्वात मोठा आयातदार देश आहे. भारत आपल्या एकूण गरजेच्या जवळपास दोन-तृतियांश खाद्यतेल मलेशिया, इंडोनेशिया, अर्जेंटिना, रशिया आणि युक्रेनमधून आयात करतो. नवरात्र, दसरा आणि दिवाळी या प्रमुख सणांच्या काळात तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. मागील वर्षभरात भारतात वनस्पती तेलाच्या किंमतीत तब्बल २० टक्क्यांनी वाढ झाली होती. त्यामुळे सप्टेंबर ते नोव्हेंबर या सणांच्या काळात भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
कशी आहे आयात शुल्कातील कपात?
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या कपातीचा तक्ता खालीलप्रमाणे आहे:
कच्चे सोयाबीन व पाम तेल: आयात शुल्क १० टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आले आहे.
शुद्ध सोयाबीन व पाम तेल: आयात शुल्क ३२.५ टक्क्यांवरून २७.५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे.
कच्चे सूर्यफूल तेल: १० टक्के आयात शुल्क पूर्णतः रद्द करण्यात आले आहे.
शुद्ध सूर्यफूल तेल: आयात शुल्क ३२.५ टक्क्यांवरून २२.५ टक्क्यांवर आणले आहे.
प्रत्यक्ष लाभासाठी पुरवठा साखळी महत्त्वाची
या आयात शुल्क कपातीमुळे खाद्यतेलांच्या आयातीचा खर्च कमी होण्यास मदत होईल. मात्र, ग्राहकांना प्रत्यक्ष मिळणारा दिलासा हा पुरवठा साखळीत या शुल्क कपातीचा लाभ पुढे कशा प्रकारे पोहोचवला जातो, यावर अवलंबून असणार आहे.














