Mandangad Palgharwadi Ganpati: ‘खेड्याकडे चला’चा भावस्पर्शी संदेश; पालघरवाडी गणेशोत्सव मंडळाचा देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू

Mandangad Palgharwadi Ganpati: 'खेड्याकडे चला'चा भावस्पर्शी संदेश; पालघरवाडी गणेशोत्सव मंडळाचा देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू

कोकणची समृद्ध ग्रामसंस्कृती आणि शेतीप्रधान जीवनाचे वास्तववादी दर्शन; ५३ वर्षांची सामाजिक प्रबोधनाची परंपरा कायम

Mandangad Palgharwadi Ganpati: कोकणची समृद्ध ग्रामीण संस्कृती, शेतीप्रधान जीवनपद्धती, सण-उत्सवांची परंपरा आणि रोजगाराच्या शोधात शहरांकडे होणारे स्थलांतर यांचे प्रभावी दर्शन घडविणारा मंडणगड तालुक्यातील पालघरवाडी गणेशोत्सव मंडळाचा यंदाचा समाजप्रबोधनपर देखावा गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘खेड्याकडे चला’ हा संदेश देणाऱ्या या देखाव्यात कोकणच्या मातीशी असलेले नाते आणि बदलत्या सामाजिक वास्तवाचे भावस्पर्शी चित्र उभे करण्यात आले आहे.

पारंपरिक शेती आणि ग्रामसंस्कृतीचे जिवंत देखाव्यातून दर्शन
या देखाव्यात पारंपरिक शेतीची विविध कामे हुबेहूब साकारण्यात आली असून कवल तोडणी, लावणी, कापणी, मळणी अशा कृषी प्रक्रियांमधून ग्रामीण जीवनाचे जिवंत चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. विशेष म्हणजे मंडळाच्या छोट्या बाल-सदस्यांनी विविध पात्रे साकारून देखाव्यात जिवंतपणा आणला आहे. गणेशोत्सव, दिवाळी, दसरा, शिमगा यांसह कोकणातील ग्रामसंस्कृती, परंपरा, ग्रामस्थांचा एकोपा आणि निसर्गाशी जोडलेले जीवन यांची सुंदर मांडणी छोट्याशा जागेत करण्यात आली आहे.

जमिनीची विक्री आणि Mandangad Palgharwadi Ganpati चा अंतर्मुख करणारा संदेश
देखाव्याचा उत्तरार्ध प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा ठरतो. रोजगारासाठी शहरांकडे गेलेल्या तरुणांची गावाशी आणि जमिनीशी तुटत चाललेली नाळ, जमिनीची विक्री आणि शेतीपासून दूर जाण्याचे वास्तव यामध्ये प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. "जमीन विकू नका, शेती सोडू नका" हा संदेश देणारे धरणीमातेचे पात्र विशेष भावस्पर्शी ठरते. शहरातील धकाधकीच्या जीवनातून गावच्या मातीचे महत्त्व उमगलेल्या तरुणाचा प्रसंग प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो.

Mahrashi karve ANM

५३ वर्षांची प्रबोधनाची उज्ज्वल परंपरा
गेल्या ५३ वर्षांपासून पालघरवाडी मंडळ समाजप्रबोधनपर देखाव्यांची परंपरा अविरत जपत असून जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कारांनी मंडळाच्या या कार्याची दखल घेतली आहे. मंडळाचे अध्यक्ष अशोक बैकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्कृष्ट देखावा उभारण्यात आला असून तो पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.