पुणे-राजापूर एसटी बसमधील गर्दीत अनावधानाने बदलली होती बॅग; पोलिसांच्या तत्परतेमुळे महिलेला परत मिळाला मौल्यवान ऐवज
Rajapur Bus Bag Recovery: राजापूर आगाराच्या पुणे ते राजापूर एसटी बसने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशी महिलेच्या दागिने व कपड्यांनी भरलेल्या बॅगेचा शोध लावण्यात राजापूर पोलिसांना अवघ्या काही तासांतच मोठे यश आले आहे. एसटी बसमध्येच राहून गेलेल्या एका दुसऱ्या प्रवाशाच्या बॅगेतील टी-शर्टवर लिहिलेल्या पत्त्यावरून पोलिसांनी मूळ व्यक्तीचा शोध घेतला आणि २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने सुरक्षितपणे संबंधित महिलेच्या स्वाधीन केले.
पाचल येथे प्रवासादरम्यान लक्षात आला प्रकार
अनुजा प्रशांत कांबळे (मूळ रा. पासार्डे, कोल्हापूर; सध्या रा. जैतापूर, राजापूर) या २० सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० ते सायंकाळी ५.३० च्या दरम्यान पुणे ते राजापूर एसटी बस (क्रमांक MH 14 BT 2272) मधून प्रवास करत होत्या. बस कोल्हापूर-राजापूर मार्गावरील पाचल येथे आली असता, आपल्या सीटवरील बॅग गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने पाचल येथे पोलिसांना या घटनेची माहिती दिली. या बॅगेत २५ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, ५ ग्रॅमचे दोन टॉप्स, ५ ग्रॅमची सोन्याची साखळी आणि २.५ ग्रॅमची सोन्याची अंगठी असा एकूण २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल होता.
टी-शर्टवरील पत्ता अन् पोलिसांची चतुरस्त्र तपास यंत्रणा
तक्रार प्राप्त होताच राजापूर पोलिसांनी राजापूर आगारात पोहोचून संबंधित बसची आणि प्रवाशांची बारकाईने तपासणी केली. सर्व प्रवासी उतरून गेल्यानंतर बसमध्ये एक बिगरधाव बॅग शिल्लक राहिल्याचे दिसून आले. पोलिसांनी ती बॅग उघडून तपासली असता, त्यात कपड्यांमधील एका टी-शर्टवर "नाऊळ देववाडी तिठवली, वैभववाडी" असे लिहिले असल्याचे आढळले. राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी तात्काळ त्या गावचे पोलीस पोलीस पाटील हर्याण यांच्याशी संपर्क साधून माहिती मिळवली.

गर्दीमुळे चुकून बदलली होती बॅग; फिर्याद घेतली मागे
राजापूर पोलिसांचे एक पथक तक्रारदार महिलेसह तातडीने नाऊळ देववाडी तिठवली (वैभववाडी) येथे पोहोचले. प्रवासादरम्यान घाईगडबडीत त्या प्रवाशाची स्वतःची बॅग बसमध्येच राहिली होती आणि त्याने अनावधानाने या महिलेची बॅग उचलून नेली होती. त्या व्यक्तीने ती बॅग जशीच्या तशी पोलिसांसमोर महिलेच्या स्वाधीन केली. पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या उपस्थितीत बॅग तपासली असता त्यातील सर्व सोन्याचे दागिने आणि वस्तू सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले. ऐवज सुखरूप परत मिळाल्याने संबंधित महिलेने आपली फिर्याद मागे घेतली असून राजापूर पोलिसांच्या तत्परतेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.













