Coast Guard Search Rescue Exercise: तटरक्षक दलाचा मुंबई किनारपट्टीवर थरारक शोध व बचाव सराव; ‘सम्राट’ जहाजावरून प्रात्यक्षिकांची पाहणी

Coast Guard Search Rescue Exercise: तटरक्षक दलाचा मुंबई किनारपट्टीवर थरारक शोध व बचाव सराव; 'सम्राट' जहाजावरून प्रात्यक्षिकांची पाहणी

महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती; आपत्कालीन सज्जतेचा घेतला आढावा

Coast Guard Search Rescue Exercise: भारतीय तटरक्षक दलाच्या (ICG) पश्चिम प्रादेशिक मुख्यालय, मुंबईने गुरुवारी मुंबई किनारपट्टीवर थरारक प्रादेशिक सागरी शोध व बचाव सराव (RESAREX-26) आयोजित केला होता. भारतातील सागरी शोध आणि बचावासाठी नोडल एजन्सी म्हणून, तटरक्षक दलाने आपत्कालीन कार्यप्रणालींची पडताळणी करण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्य शासन, सीमाशुल्क, बंदर प्राधिकरणे तसेच मच्छीमार समुदायासह प्रमुख राज्य व केंद्रीय घटकांमधील अंतर-कार्याक्षमता वाढवण्यासाठी हा सागरी सराव राबवला.

मुख्य सचिवांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सज्जतेची पाहणी

या सरावाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते. त्यांनी गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव (विशेष), राज्य गुप्तवार्ता विभाग (SID) आयुक्त, महानिरीक्षक (सागरी सुरक्षा) आणि राज्य प्रशासनातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह भारतीय तटरक्षक दलाच्या ‘सम्राट’ या जहाजावरून या प्रात्यक्षिकांची पाहणी केली.

Arihant 2

आधुनिक जहाजे आणि हेलिकॉप्टर्सचा थरारक सहभाग

या सागरी सरावामध्ये तैनात केलेल्या घटकांच्या जलद प्रतिसाद क्षमतेची चाचणी घेण्यासाठी अत्यंत वास्तववादी संकटकालीन परिस्थितींची रचना करण्यात आली होती. यामध्ये तटरक्षक दलाची गस्ती जहाजे, एअर कुशन वाहने, इंटरसेप्टर बोटी, चेतक आणि एएलएच एमके-३ हेलिकॉप्टर्सचा समावेश होता. सरावादरम्यान जहाजावरील अग्निशमन यंत्रणा, ‘ऑफशोअर सप्लाय व्हैसेल’वर आग लागल्याची परिस्थिती निर्माण करून त्यावर जलद प्रतिसाद देत आगीवर नियंत्रण मिळवणे व बाउंड्री कूलिंग करणे, हेलिकॉप्टरच्या सहाय्याने रेस्क्यू बास्केटचा वापर करून अचूक स्थलांतर करणे अशा प्रात्यक्षिकांचा समावेश होता.

Coast Guard Search Rescue Exercise आणि जीव वाचवण्याची तत्परता

याशिवाय चेतक हेलिकॉप्टरमधून तैनात केलेल्या तटरक्षक दलाच्या विशेष प्रशिक्षित एअरक्रू पाणबुड्यांद्वारे संकटग्रस्त दाखवण्यात आलेल्या मासेमारी बोटीवरून पाण्यात पडलेल्या व्यक्तीची समन्वयाने सुटका करणे, अत्याधुनिक रिमोटली ऑपरेटेड लाईफबॉयचा वापर करून पाण्यात अडकलेल्या लोकांची वेगाने सुटका करण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

तटरक्षक दलाचे कमांडर (महाराष्ट्र) डीआयजी सुधारक पाटील यांनी सांगितले की, "किनारपट्टी सुरक्षेमध्ये नागरी प्रशासन आणि सशस्त्र दलांमधील समन्वयाच्या महत्त्वावर भर देण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात तटरक्षक दलाने समन्वित प्रयत्नांच्या माध्यमातून शेकडो लोकांचे प्राण वाचवले आहेत." मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी तटरक्षक दल आणि इतर सहयोगी यंत्रणांनी दाखवलेल्या अचूकतेचे कौतुक केले.