भरधाव वेग, रॅश ड्रायव्हिंग आणि वेळेचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर होणार कारवाई; प्रवाशांनाही लवकरच मिळणार बसचे लाईव्ह लोकेशन
Ratnagiri ST Bus GPS Tracking: रत्नागिरी जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या ६५५ गाड्यांवर अत्याधुनिक जीपीएस (GPS) यंत्रणा यशस्वीरीत्या बसवण्यात आली आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे एसटीचा धावता कारभार आणि चालकांचे वर्तन थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेखाली आले आहे. बसचे सध्याचे लोकेशन समजण्यासोबतच गाडी ठरलेल्या वेळेत सुटली किंवा पोहोचली का, कुठे अनावश्यक थांबली आणि दिवसभरात किती फेऱ्या पूर्ण झाल्या, या सर्व बाबींचा अचूक डाटा आता संकलित केला जात आहे.
रॅश ड्रायव्हिंग आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई
या जीपीएस यंत्रणेमुळे केवळ बसच्या फेऱ्यांचीच नाही, तर चालकाच्या ड्रायव्हिंगच्या पद्धतीचीही माहिती मिळत आहे. चालकाने गाडी विनाकारण भरधाव पळवली का, रॅश ड्रायव्हिंग करून जोरात ब्रेक दाबले का, याचा सविस्तर अहवाल डिजिटल प्रणालीवर तयार होत आहे. सध्या एसटी महामंडळाच्या ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम’ (Vehicle Tracking System) अॅपच्या माध्यमातून सर्व गाड्यांचे पूर्ण नियंत्रण अधिकारी वर्गाकडे आहे. ज्या चालकांचे ड्रायव्हिंग धोकादायक आढळेल किंवा जे चालक वेळापत्रकाचे पालन करणार नाहीत, त्यांना प्रथम समज देऊन आवश्यक ती प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे.
प्रवाशांनाही लवकरच मोबाईलवर मिळणार बसचे अचूक लोकेशन
सध्या ही सुविधा केवळ अधिकाऱ्यांच्या देखरेख आणि नियंत्रणासाठी सुरू आहे. मात्र, आगामी काळात हे अॅप सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुले करण्याचे नियोजन आहे. यामुळे आपली बस नेमकी कुठे पोहोचली आहे आणि ती थांब्यावर कधी येणार, याची अचूक माहिती प्रवाशांना मोबाईलवरच उपलब्ध होणार आहे. शहरी भागातील १० गाड्या वगळता उर्वरित सर्व ६५५ गाड्यांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

Ratnagiri ST Bus GPS Tracking आणि प्रवाशांची सुरक्षा
जीपीएस प्रणालीमुळे गाड्यांच्या वेळा पाळण्यावर आणि सुरक्षेवर कडक नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे. प्रवासादरम्यान अचानक गाडीत तांत्रिक बिघाड झाल्यास किंवा आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास त्याची तत्काळ माहिती नियंत्रण कक्षाला मिळण्यास मदत होत आहे. कोणत्याही अनुचित प्रकाराबाबत कठोर पावले उचलली जातील, अशी माहिती रत्नागिरीचे एसटी विभाग नियंत्रक अश्वजित जानराव यांनी दिली आहे.












