महाराष्ट्रातील ‘SIR’ प्रक्रिया पूर्णपणे रद्द करून निष्पक्ष चौकशी करण्याची मनसेची मागणी; बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी सर्व पक्षांना एकत्र येण्याचे राज ठाकरेंचे आवाहन
Raj Thackeray on ECI SIR Dispute: केंद्रीय निवडणूक आयोगातील (ECI) अंतर्गत मतभेद आणि मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवरून देशातील राजकीय वातावरण अत्यंत तापले आहे. ठाकरे गटाचे नेते, काँग्रेस आणि सीजेपी (CJP) पाठोपाठ आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (ट्विटर) द्वारे टीका करताना राज ठाकरेंनी नुकतीच पार पडलेली मतदारयादी सुधारणा मोहीम (SIR) पूर्णपणे रद्द करण्याची आग्रही मागणी केली आहे.
राज ठाकरेंची खोचक टीका अन् मनसेची प्रमुख मागणी
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद वदवतायत. गेले दोन दिवस ज्ञानेश कुमार गप्प झालेत आणि त्यांना बोलतं करणारे पण कुठेच दिसत नाहीत. अशा लोकांना हाताशी धरून सत्ताधारी अमरपट्टा घेऊन आल्याचे दाखवत आहेत." एसआयआर प्रक्रियेतील घोटाळे खुद्द निवडणूक आयुक्तच समोर आणत असल्यामुळे ही संपूर्ण SIR प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यात यावी, यात कसे घोळ झाले याची निष्पक्ष चौकशी करून नव्याने प्रक्रिया राबवावी, अशी ठाम मागणी मनसेने केली आहे. तसेच, यापुढे सर्व निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवरच घेण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मोठे आंदोलन उभे केले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.
राहुल गांधी अन् सीजेपी आक्रमक; ४८ तासांचा अल्टिमेटम
दुसरीकडे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि मोदी सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. "लोकशाहीचा विनाश करणारा आणि देशद्रोह करणारा" अशा कडक शब्दांत त्यांनी निवडणूक आयोगावर हल्ला चढवला. "जनता नाराज असतानाही प्रत्येक निवडणुकीत भाजपच कसा जिंकतो?" असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. तर कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजित दीपके यांनी ज्ञानेश कुमार यांनी ४८ तासांत राजीनामा न दिल्यास देशव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर आणि विश्वासर्हतेवर सर्वच प्रमुख विरोधी पक्षांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे ज्ञानेश कुमार आणि केंद्रीय निवडणूक आयोगापुढील अडचणी वाढल्या आहेत.












