ज्ञानेश कुमार गुन्हेगार; संजय राऊतांचा मुख्य निवडणूक आयुक्त आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut Controversy: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर थेट शब्दांत निशाणा साधला आहे. "आताचा भारत हा जागृत भारत आहे, मोदींनी गुंगीचे औषध दिलेला भारत नाही," असे सांगत त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोग आणि भाजपवर घणाघाती टीका केली. तसेच, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तातडीने ‘माफीचा साक्षीदार’ व्हावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
"ज्ञानेश कुमार गुन्हेगार, पंतप्रधानांमुळे लोकशाहीची हत्या"
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे गुन्हेगार आहेतच, पण देशाचे खरे गुन्हेगार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आहेत. त्यांनी सर्वच घटनात्मक संस्थांवर हुकूमशाही पद्धतीने ताबा मिळवला आहे. "राष्ट्रपती, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाला गुलाम बनवण्यात आले आहे," असा गंभीर आरोप करत त्यांनी लोकशाहीची हत्या झाल्याचा दावा केला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे उदाहरण देत ते म्हणाले की, "इंदिरा गांधी या लोकशाहीच्या सर्वात मोठ्या संरक्षक होत्या, त्यांनाही घोटाळे करून जिंकता आले असते, पण त्यांनी लोकशाहीचा आदर केला."
Sanjay Raut Controversy: २०२९ च्या बदलावर भाष्य अन् आक्रमक भाषा
संजय राऊत यांनी २०२९ च्या आगामी राजकीय समीकरणांवर भाष्य करताना सांगितले की, "२०२९ मध्ये देशात नक्कीच सत्तापालट आणि फेरबदल होणार आहे. त्यानंतर देशात न्याय सरकार येईल आणि गद्दारांना पळून पळून जोडे मारले जातील. या गद्दारांना पहिला बूट मी स्वतः फेकून मारेन!" ज्ञानेश कुमार यांच्यावरील महाभियोगाची नोटीस आधी राज्यसभेच्या सभापतींनी फेटाळली होती, मात्र आता ती फेटाळता येणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

दुष्काळावर भाजपने इव्हेंटबाजी बंद करावी
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना संजय राऊत यांनी राज्य सरकारला इव्हेंटबाजी थांबवण्याचा इशारा दिला. शेतकरी संकटात असून त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने राजकारणा पलीकडे जाऊन तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावावी, अशी मागणी त्यांनी केली. आधीच्या कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ कोणाला मिळाला याचा हिशोब मांडत दुष्काळ निवारणाचा भाजपने राजकीय इव्हेंट करू नये, असा टोला त्यांनी लगावला.












