Ratnagiri Sanskrit Krutisatra: संस्कृत ही केवळ भाषा नसून संस्कृती; तिचे जतन व संवर्धन आवश्यक – शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे

Ratnagiri Sanskrit Krutisatra: संस्कृत ही केवळ भाषा नसून संस्कृती; तिचे जतन व संवर्धन आवश्यक - शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात संस्कृत कृतिसत्राचा उत्साहात समारोप; गुणवंत विद्यार्थ्यांचा व सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान

Ratnagiri Sanskrit Krutisatra: संस्कृत भाषा ही केवळ अभ्यासापुरती मर्यादित नसून ती आपली संस्कृती आहे. आपले संस्कार या भाषेवर अवलंबून असल्याने संस्कृतचे जतन आणि संवर्धन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांनी केले.

रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग, रत्नागिरी जिल्हा संस्कृत शिक्षक मंडळ आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘संस्कृत कृतिसत्र’ समारोप प्रसंगी ते बोलत होते.

करिअरच्या स्पर्धेत संस्कारांचे महत्त्व
शिक्षणाधिकारी मेंगाणे पुढे म्हणाले की, "आजच्या काळात शिक्षण हे केवळ करिअर किंवा नोकरीपुरते मर्यादित राहिले आहे. त्यामुळे अनेक विषयांकडे दुर्लक्ष होते, मात्र शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये योग्य संस्कार रुजवले पाहिजेत. संस्कृत शिक्षक मंडळ विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी विविध उपक्रम राबवत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे."

Ronic

संवादातून भाषा शिक्षण व्हावे आनंददायी
अध्यक्षीय भाषणात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या उपप्राचार्य व संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये म्हणाल्या की, "पूर्वी मातृभाषेतून संस्कृत शिकवले जायचे, परंतु आता ‘संस्कृतमधून संस्कृत’ शिकवण्यावर भर दिला जात आहे. संवादातून भाषा शिक्षण अधिक जिवंत व आनंददायी होते." त्यांनी दर महिन्याला संस्कृत शिक्षकांची ऑनलाईन मार्गदर्शन बैठक घेण्याचा प्रस्तावही मांडला.

सावंतवाडीच्या वेदशाळेचे अध्यक्ष राजाराम चिपळूणकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना सांगितले की, "युवा पिढीला योग्य दिशा देण्यासाठी संस्कृत, संस्कार आणि संस्कृतीशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येकाने संस्कृत बोलण्याचा आणि शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे."

सांस्कृतिक कार्यक्रम अन् गुणवंतांचा गौरव
या सोहळ्यात पहिल्या टप्प्यात रत्नागिरी शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी संस्कृत गीतगायन, नृत्य आणि नाटिकांचे सुरेख सादरीकरण केले.

विशेष सत्कार: कार्यक्रमादरम्यान सेवानिवृत्त संस्कृत शिक्षिकांचा सन्मान, नवीन शिक्षकांचे स्वागत आणि इयत्ता १० वीच्या परीक्षेत संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले.

उपस्थिती: संपूर्ण जिल्ह्यातून ५० हून अधिक संस्कृत शिक्षक या कृतिसत्राला उपस्थित होते.

या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा मंडळाच्या अध्यक्षा स्मिता सरदेसाई यांनी घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष योगदान देणाऱ्या स्मिता सरदेसाई आणि वीणा काजरेकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा भट, प्रीती टिकेकर व मीनाक्षी तेरेदेसाई यांनी केले, तर सुमंत भिडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.