तहसीलदार राजाराम म्हात्रे यांचे रत्नागिरी तालुक्यातील नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन; ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत उपक्रम
Ratnagiri Seva Sankalp Abhiyan: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्यभरात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबवले जात आहे. या अभियानांतर्गत रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव येथील ग्रामपंचायत सभागृहात येत्या २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विशेष नागरी सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
एकाच छताखाली मिळणार ‘या’ प्रमुख शासकीय सेवा
सामान्य नागरिकांना शासकीय योजना व दाखल्यांसाठी विविध कार्यालयांत मारावे लागणारे फेरे वाचवण्यासाठी या शिबिरामध्ये एकाच ठिकाणी बहुतांश प्रमुख सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत:
महसूल व भूमी अभिलेख: प्रलंबित फेरफार नोंदीचा तातडीने निपटारा करणे, ‘जिवंत ७/१२’ मोहीम, गावठाणातील नागरिकांना ‘स्वामित्व सनद’ वाटप, विविध महसुली दाखले देणे तसेच जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार मोजणीशी जोडणे.

ग्रामपंचायत व अन्न-नागरी पुरवठा: पात्र लाभार्थ्यांना नवीन शिधापत्रिका (रेशन कार्ड) वितरण, मालमत्ता हस्तांतर नोंद व कर आकारणी, विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच जन्म-मृत्यू नोंद दाखले.
कृषी व आधार सुविधा: कृषी विभागामार्फत ‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने’अंतर्गत सिंचन विहिरींसाठी अनुसूचित जमातीच्या (ST) लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी, महिला बचत गटांना मार्गदर्शन आणि नागरिकांसाठी थेट आधार सेवा.
जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन
ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी आपल्या प्रलंबित कामांचा निपटारा करून घेण्यासाठी आणि शासकीय दाखले मिळवण्यासाठी २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी केले आहे.













