मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एसएनडीटी विद्यापीठात महिलांसाठीच्या विशेष रोजगार मेळाव्याचे उद्घाटन; ४१८ पेक्षा जास्त ठिकाणी आयोजन
Maharashtra Rojgar Mahakumbh 2026: महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने येत्या २९ सप्टेंबर २०२६ रोजी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. आगामी निवडणुकांची आचारसंहिता लक्षात घेता हा उपक्रम टप्प्याटप्प्याने राबवला जात असून, पहिल्या टप्प्यात नाशिक आणि कोकण विभागातील १२ जिल्ह्यांमध्ये या भव्य रोजगार महाकुंभाचे आयोजन केले जात आहे.
मुंबईत महिलांसाठी विशेष मेळावा; मुख्यमंत्री करणार उद्घाटन
महिलांच्या रोजगारातील सहभागाला विशेष प्रोत्साहन देण्यासाठी २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता मुंबईतील एसएनडीटी (SNDT) महिला विद्यापीठात केवळ महिलांसाठी विशेष रोजगार मेळावा व प्लेसमेंट ड्राइव्ह होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. याच वेळी नाशिक आणि कोकण विभागातील संपूर्ण रोजगार महाकुंभाचा एकत्रित शुभारंभ केला जाईल.
नाशिक अन् कोकण विभागात भव्य तयारी
नाशिक व कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये मिळून ४१८ हून अधिक ठिकाणी रोजगार मेळावे आणि प्लेसमेंट ड्राइव्ह पार पडणार आहेत.

कंपन्या आणि रोजगाराच्या संधी: आतापर्यंत १,५०० हून अधिक कंपन्या व नियोक्त्यांनी यात सहभाग नोंदवला असून, २५,००० पेक्षा जास्त रिक्त पदांची (Rozgar Vacancies) मागणी केली आहे.
उमेदवारांची नोंदणी: १ लाखांपेक्षा अधिक इच्छुक युवक-युवतींनी या महाकुंभासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे.
कॅन्डिडेट-व्हॅकन्सी मॅचिंग: आयटीआय (ITI), महाविद्यालये, स्थानिक प्रशासन आणि उद्योगांच्या समन्वयातून उमेदवारांच्या पात्रतेनुसार योग्य पदांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
प्री-प्लेसमेंट ट्रेनिंगद्वारे उमेदवारांची पूर्वतयारी
उमेदवारांना मुलाखतींमध्ये यश मिळावे यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत ‘प्री-प्लेसमेंट ट्रेनिंग ड्राइव्ह’ राबवण्यात आली आहे. यामध्ये सॉफ्ट स्किल्स, व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्य आणि मुलाखतीची तयारी यांसारख्या विषयांवर युवकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक युवक-युवतीला त्यांच्या कौशल्यानुसार रोजगाराची संधी मिळवून देणे आणि उद्योगांच्या गरजांची योग्य सांगड घालणे, हा या ‘रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र’चा मुख्य उद्देश आहे.













