जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा परिषदेचा संयुक्त उपक्रम; ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत शैक्षणिक ग्रामसभांचे आयोजन
Ratnagiri Cyber Security Gram Sabha: सध्याच्या डिजिटल युगात वेगाने वाढणारी सायबर गुन्हेगारी, ऑनलाईन आर्थिक फसवणूक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या ‘डिजिटल अरेस्ट’ (Digital Arrest) सारख्या गंभीर प्रकारांना आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने मोठा पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील तब्बल ८४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘सायबर सुरक्षा आणि डिजिटल साक्षरता’ या विषयावर व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. २१ ते २९ सप्टेंबर दरम्यान आयोजित विशेष ‘शैक्षणिक ग्रामसभां’च्या माध्यमातून हा जनजागृतीचा जागर थेट ग्रामीण भागातील घराघरांपर्यंत पोहोचवला जात आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) वैदेही रानडे यांनी दिली.
पोलीस आणि अग्रणी बँकेचा सक्रिय सहभाग
जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात येत आहे.
दृकश्राव्य सादरीकरण: जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत डिजिटल सुरक्षा आणि सायबर क्राईमपासून बचावाबाबत पीपीटी व व्हिडिओ सादरीकरण (Visual Presentation) केले जात आहे.

आर्थिक साक्षरता: ऑनलाईन गैरव्यवहारांमधून नागरिकांचे कष्टाचे पैसे बँक खात्यातून लंपास होऊ नयेत आणि ऑनलाईन व्यवहारात कोणती खबरदारी घ्यावी, याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा अग्रणी बँकेलाही (Lead Bank) या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले आहे.
विद्यार्थी, तरुण आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या शैक्षणिक ग्रामसभांमध्ये सर्व वयोगटांतील शालेय विद्यार्थी, तरुण पिढी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. मोबाईलचा सुरक्षित वापर, ओटीपी (OTP) शेअर न करणे, संशयास्पद लिंक्स व कॉल्सना न भुलणे आणि डिजिटल साक्षरतेचे महत्त्व यावर थेट संवाद साधला जात असून, या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक गाव सायबरदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत विविध उपक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाच्या २५ व्या वर्षपूर्तीनिमित्त जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियाना’चा हा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. या अभियानाची सुरुवात जिल्ह्यात रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिरे आणि वृक्षलागवडीने झाली आहे. याशिवाय, गणेशोत्सवानंतर बाणकोट ते नाटेपर्यंतच्या संपूर्ण किनारपट्टीवर व्यापक सागरी स्वच्छता मोहीम राबवली जात असून, जिल्हा परिषदेच्या १६ विभागांच्या माध्यमातून महिनाभर लोकप्रबोधनाचे उपक्रम राबवले जात असल्याचे वैदेही रानडे यांनी स्पष्ट केले.













