Maharashtra Weather: परतीच्या पावसाबाबत नवा अंदाज; ‘या’ जिल्ह्यांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather: परतीच्या पावसाबाबत नवा अंदाज; 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता

विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची स्थिती; राज्यात बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहण्याचा अंदाज

राज्यातील बहुतांश भागात पावसाने ओढ दिल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून अनेक भागात पिके करपू लागली आहेत. पावसाळा सुरू होऊन चार महिन्यांचा कालावधी होत आला तरी पाऊस न पडल्याने शेतकरी वर्ग कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहे. अशा बिकट परिस्थितीत आता पुढे परतीचा पाऊस पडणार का, असा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आगामी पावसाबाबत महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे.

२६ तारखेपासून राज्यातील बहुतांश भागात हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असल्याचे डख यांनी स्पष्ट केले आहे. वातावरण कोरडे असल्यामुळे दुपारपर्यंत कडक ऊन पडेल, मात्र स्थानिक हवामानात होणाऱ्या बदलांमुळे काही भागांत तुरळक स्वरूपात पाऊस पडू शकतो. सर्वदूर असा मुसळधार पाऊस होणार नसून, पावसाचा मुख्य जोर हा पूर्व विदर्भातच पाहायला मिळेल. पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

२९ आणि ३० सप्टेंबरदरम्यान पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता

Tata motars punch

पश्चिम महाराष्ट्रातील वातावरणात बदल होऊन तिथे पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण होणार असल्याचे पंजाबराव डख यांनी सांगितले. २९ आणि ३० सप्टेंबरदरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

याच कालावधीत कोकण किनारपट्टीतदेखील पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. मात्र, उर्वरित महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल वातावरण नसून तेथे हवामान मुख्यत्वे कोरडेच राहील, असे डख यांनी स्पष्ट केले आहे.

विशाखापट्टणमजवळ कमी दाबाचा पट्टा; विदर्भात पुढचे दोन-तीन दिवस पाऊस

पुढच्या दोन ते तीन दिवसांत विदर्भात चांगल्या पावसाची शक्यता डख यांनी व्यक्त केली आहे. विशाखापट्टणमजवळ कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पूर्व विदर्भात चांगला पाऊस पडेल. यात पूर्व विदर्भात मोठा पाऊस, तर पश्चिम विदर्भात रिमझिम पावसाची शक्यता आहे.

इतर ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपातच पाऊस पाहायला मिळेल. पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर हे जिल्हे सोडल्यास राज्यातील इतर भागात मोठा पाऊस पडण्याची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांना स्थानिक वातावरणातील बदलांवर लक्ष ठेवावे लागणार आहे.