Lalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाचे गिरगाव चौपाटीवर भावूक वातावरणात विसर्जन; २२ तासांच्या मिरवणुकीनंतर लाडक्या बाप्पाला निरोप

Lalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाचे गिरगाव चौपाटीवर भावूक वातावरणात विसर्जन; २२ तासांच्या मिरवणुकीनंतर लाडक्या बाप्पाला निरोप

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात अरबी समुद्रात राजा विलीन; चौपाटीवर हजारो भाविक उपस्थित

मुंबई:
‘नवसाला पावणारा’ अशी ख्याती असलेल्या मुंबईतील प्रसिद्ध ‘लालबागच्या राजा’ची उत्तरपूजा आणि भव्य मिरवणूक पूर्ण झाल्यानंतर अखेर २२ तासांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर लाडक्या राजाचे गिरगाव चौपाटीवर भावूक वातावरणात विसर्जन करण्यात आले. शुक्रवारी दुपारी १ वाजता मंडपातून प्रस्थान झालेला लालबागचा राजा शनिवारी सकाळी जवळपास ७ च्या सुमारास गिरगाव चौपाटीवर पोहोचला. राजाला निरोप देण्यासाठी चौपाटीवर आणि संपूर्ण मिरवणूक मार्गावर भाविकांचा अथांग जनसागर उसळला होता.

मंडपातून बाहेर पडल्यापासून ते गिरगाव चौपाटीपर्यंत संपूर्ण मार्गात भाविकांनी अलोट गर्दी करत राजाचे अतिशय दिमाखात आणि उत्साहात स्वागत केले. ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. २४ तास चाललेल्या या सोहळ्यात आपल्या लाडक्या दैवताला डोळे भरून पाहण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी अबालवृद्धांनी हजेरी लावली होती.

सुवर्णालंकार काढले आणि अत्याधुनिक बार्जवर मूर्ती विराजमान
विधीवत उत्तरपूजा आणि आरती संपन्न झाल्यानंतर प्रथेप्रमाणे लालबागच्या राजाच्या अंगावरील मौल्यवान सोन्या-चांदीचे दागिने सुरक्षितपणे काढण्यात आले. राजाच्या अंगावरील सुवर्णालंकार काढतानाचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

Shree clinic

त्यानंतर राजाची भव्य मूर्ती विसर्जनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या विशेष ‘बार्ज’वर (बोट) विराजमान करण्यात आली. स्थानिक कोळी बांधव आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने बार्ज समुद्रात खोलवर नेण्यात आले.

अश्रूपूर्ण नयनांनी लाडक्या राजाला निरोप
चौपाटीवर जमलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत, कोळी बांधवांच्या पारंपरिक तालावर आणि जयघोषात लालबागच्या राजाचे अरबी समुद्रात विसर्जन करण्यात आले.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुरू झालेला हा विसर्जन सोहळा दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्ण झाला. आपल्या लाडक्या राजाला निरोप देताना अनेक भाविकांना अश्रू अनावर झाले होते. पुढच्या वर्षी पुन्हा राजाच्या दर्शनाला येण्याचा संकल्प करत हजारो भाविकांनी राजाला निरोप दिला.